Advertisement

कोरोना निर्बंधांची आडकाठी फक्त महाराष्ट्रातच का?- राज ठाकरे

बाहेरच्या राज्यांमध्ये सगळंकाही सुरळीत सुरू असताना कोरोना निर्बंधांची आडकाठी केवळ महाराष्ट्रातच का असा संतप्त सवाल राज ठाकरे यांनी केला.

कोरोना निर्बंधांची आडकाठी फक्त महाराष्ट्रातच का?- राज ठाकरे
SHARES

बाहेरच्या राज्यांमध्ये सगळंकाही सुरळीत सुरू असताना कोरोना निर्बंधांची आडकाठी केवळ महाराष्ट्रातच (maharashtra) का असा संतप्त सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारला केला. 

पुणे दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त त्यांची भेट घेतली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. विशेषकरून राज्यातील कोरोना निर्बंधांवर बोलताना त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, सरकारला लाॅकडाऊन करायला काय जातंय, पण लाॅकडाऊनमुळे उद्योगधंदे बुडालेत. लोकांच्या नोकऱ्या गेल्याने जगणं मुश्कील झालंय. आहेत. घरं कशी चालवायची, मुलांची फी कशी भरायची हे लोकांना कळेनासं झालंय. सरकार लाॅकडाऊन करतं, पण भोगावं सामान्य माणसाला लागतंय.

हेही वाचा- मुख्यमंत्री Work From Home करू शकतात, पण मुंबईकरांना ऑफिसला जावं लागतं - केशव उपाध्ये

इतर राज्यांमध्ये सगळं सुरळीत सुरू असताना कोरोना (coronavirus) निर्बंधांची आडकाठी फक्त महाराष्ट्रातच का? तिसरी लाट येण्याच्या भीतीने आताच घाबरून घरात बसायचं याला काय अर्थ आहे? लोकांचे हाल तुम्ही बघणार आहात की नाही? की दुष्काळ आवडे सर्वांना तसं लाॅकडाऊन आवडे सरकारला, अशी स्थिती आहे का? असंच जर असेल, तर कुणी प्रश्नच विचारायला नकोत, असा टोलाही राज यांनी लगावला.  

आता रेल्वे सुरू करण्याचा विचार राज्य सरकार करत असल्याचं आम्ही ऐकतोय. पण मुंबईकरांचे रोजचे हाल थांबवण्यासाठी मुंबईची लोकल सेवा निदान ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत, अशा सर्वांसाठी अत्यंत तातडीनं सुरू करावी, अशी मागणी मी आधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. मुख्यमंत्री किंवा त्यांचे मंत्री हे लोकांना भेटतात की नाही, याच्याशी खरंतर लोकांनाही काही देणंघेणं नसतं. राज्य व्यवस्थित चालावं. सोयीसुविधा व्यवस्थित मिळाव्यात एवढीच त्यांची अपेक्षा असते, असं म्हणणंही राज ठाकरे (raj thackeray) यांनी मांडलं.

भाजपसोबतच्या युतीसंदर्भात बोलताना राज यांनी आपल्या राजकीय भूमिका फार स्पष्ट असल्याचं सांगितलं. माझं वैयक्तिक वैर कुणाशीही नाही. मला मोदींच्या, अमित शाहांच्या भूमिका पटत नाहीत. त्या नाही पटल्या तर मी तसं सांगतो. ज्या भूमिका पटल्या त्या पटल्या, असंही राज ठाकरे म्हणाले.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा