Advertisement

प्लास्टिक वापरावरील निर्बंध शिथिल, 'या' वस्तू वापरता येणार

काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, तसेच लघु उद्योजकांच्या संघटनांकडून ही बंदी उठविण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली होती.

प्लास्टिक वापरावरील निर्बंध शिथिल, 'या' वस्तू वापरता येणार
SHARES

राज्यात एकल वापराच्या (सिंगल युज) प्लास्टिकच्या वस्तूंवर घालण्यात आलेले निर्बंध शिथील करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने अधिसूचनेद्वारे गुरुवारी जाहीर केला.

नव्या निर्णयानुसार प्लास्टिकच्या ६० जीएसएमपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या, पेपर, स्ट्रॉ, चमचे, काटे, द्रोण आणि इतर तत्सम वस्तूंना सशर्त परवानगी देण्यात आली आहे. महाराष्ट्र अविघटनशील कचरा अधिनियम २००६मध्ये बदल करत सरकारने हा निर्णय घेतला आहे.

या नव्या निर्णयानुसार विघटनशील पदार्थांपासून, प्लास्टिकपासून बनवलेल्या स्ट्रॉ, ताट, कप, ताटे, ग्लास, काटे, चमचे, भांडे, वाडगा, कंटेनर आदी वस्तू विघटनशील असल्याचे प्रमाणपत्र सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ प्लास्टिक इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (सीआयपीईटी) व केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून घ्यावे लागणार आहे. त्याचबरोबर पॅकेजिंगसाठी वापरण्यात येणारे आवरण ५० मायक्रोनपेक्षा जास्त जाडीचे असावे, अशी अट घालण्यात आली आहे.

राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाने २३ मार्च २०१८ रोजी अधिसूचना प्रसिद्ध करीत एकल वापर प्लास्टिकवर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यावेळी प्लास्टिक पॅकिंगवरही बंदी घालण्यात आली होती.

तसेच केंद्र सरकारने १ जुलै रोजी एकल वापर प्लास्टिक बंदीचा निर्णय जाहीर केला होता. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने या आदेशाच्या अनुषंगाने प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवरही १५ जुलैपासून बंदी घालत आधीचीच बंदी अधिक कडक केली होती.

मात्र, काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, तसेच लघु उद्योजकांच्या संघटनांकडून ही बंदी उठविण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात बैठक घेतल्यानंतर नवीन अधिसूचना जारी करण्यात आली आहे.हेही वाचा

मलबार हिल टेकडीला संरक्षण भिंत उभारणार

नोकरीची मोठी संधी, मुंबईत शनिवारी महारोजगार मेळावा

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा