राज्यातील (maharashtra) नागरिकांना जास्तीत जास्त शासकीय सेवा मोबाईलवर उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यासाठी ऑनलाइन प्रणाली विकसित करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी गुरुवारी मंत्री परिषदेच्या बैठकीत दिल्या.
या वेळी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा (ladki bahin yojna) प्रलंबित हप्ता देण्यासाठी 3,690 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यासही मंजुरी देण्यात आली. तसेच योजनेचा पुढील हप्ता 26 जानेवारीपर्यंत देण्यात येणार आहे, असे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले.
राज्यातील विविध विभागांच्या 969 सेवा अधिसूचित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ‘आपले सरकार’ संकेतस्थळावर 536 सेवा उपलब्ध असून संबंधित विभागाच्या संकेतस्थळांवर 90 सेवा आहेत.
मात्र 343 सेवा ऑफलाइन पद्धतीने दिल्या जातात. या सर्व सेवा ‘आपले सरकार ’ संकेतस्थळावर उपलब्ध करून द्याव्यात व त्यासाठी माहिती-तंत्रज्ञान विभागाने पुढाकार घ्यावा. हे काम 100 दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
अनेक सेवा अधिसूचित करण्यात आलेल्या नाहीत. त्यासाठी संबंधित मंत्री आणि सचिवांनी पुढाकार घ्यावा. नागरिकांना 99 टक्के शासकीय सेवा मोबाईलवर उपलब्ध झाल्या पाहिजेत. त्यामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयात वारंवार जाण्याची आवश्यकता भासणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राज्यात ‘ईज ऑफ डुईंग बिझिनेस’ संकल्पनेवर काम करण्यास भर दिला जात असून त्यासाठी अधिकारांचे विकेंद्रीकरण करणे आवश्यक आहे. क्षेत्रीय स्तरावरील अधिकार शासनाकडे केंद्रीत केले जाऊ नये, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.
हेही वाचा