देशभरातील महत्त्वाची शहरे वंदे भारत एक्स्प्रेसने (vande bharat express) जोडली गेली आहेत. मात्र या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये केवळ आसन व्यवस्था असल्यामुळे प्रवाशांना लांबचा प्रवास त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे आता स्लीपर क्लास असलेली वंदे भारत एक्स्प्रेस चालवण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वेवर (western railway) बुधवारी स्लीपर क्लास वंदे भारत एक्स्प्रेसची चाचणी यशस्वीपणे पूर्ण झाली. पश्चिम रेल्वेवर बुधवारी अहमदाबाद (ahmedabad) – मुंबई सेंट्रलदरम्यान (mumbai central) ही चाचणी करण्यात आली. स्लीपर क्लास वंदे भारत एक्स्प्रेसची प्रतितास 130 किमी वेगाने चाचणी घेण्यात आली.
संशोधन रचना आणि मानक संस्थेतर्फे (RDSO) याचे अंतिम प्रमाणपत्र जारी करण्यात येणार आहे. तसेच ‘जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने तयार केलेली ही वंदे भारत एक्स्प्रेस दुपारी 1.50 वाजता मुंबई (mumbai) सेंट्रलला पोहोचली.
यावेळी रेल्वे स्थानकावर उपस्थित असलेल्या रेल्वे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नव्या स्लीपर क्लास वंदे भारतचे स्वागत केले.
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, लांबपल्ल्याच्या प्रवासात प्रवाशांना आराम मिळावा यासाठी अत्याधुनिक रचना केली आहे. 16 डब्यांच्या एक्स्प्रेसमध्ये तृतीय वातानुकूलित श्रेणीचे 11 डबे, द्वितीय वातानुकूलित श्रेणीचे 4 डबे, प्रथम वातानुकूलितचा एक डबा असेल.
प्रथम वातानुकूलित डब्यांमध्ये 24 बर्थ, द्वितीय वातानुकूलित डब्यांच्या प्रत्येक डब्यात 48 बर्थ, तृतीय वातानुकूलित पाच डब्यांमध्ये प्रत्येकी 67 बर्थ, चार डब्यांमध्ये प्रत्येकी 54 बर्थ, दोन डब्यांमध्ये प्रत्येकी 28 बर्थ असतील.
प्रत्येक डब्यामध्ये चार्जिंग पोर्ट, फोल्डेबल स्नॅक टेबल्स, इंटिग्रेटेड लाइटिंग सिस्टम आणि लॅपटॉप चार्जिंग पॉइंट्स यांसारख्या सुविधा असतील. दृष्टिहीन प्रवाशांना सूचित करण्यासाठी ब्रेल चिन्हे लावण्यात आली आहेत. तसेच या एक्स्प्रेसमध्ये श्वानांसाठी विशेष आसन सुविधा केली आहे.
हेही वाचा