कधी येणार पालिका प्रशासनाला जाग?

 MAHIM
कधी येणार पालिका प्रशासनाला जाग?

स्वच्छ भारत अभियानांतर्गत माहिमच्या बब्बन कपांउंडमध्ये बांधलेल्या शौचालायाची दयनीय अवस्था झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. विशेष म्हणजे याचा त्रास येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत असून, त्यांना तुटलेल्या शौचालयाचा वापर करावा लागतोय अन्यथा उघड्यावर नैसर्गिक विधी करावे लागत आहेत. यामुळे बब्बन कपाउंड परिसरात घाणीचे साम्राज्य पसरलं आहे. याबाबत पालिका प्रशासनाला वारंवार तक्रार देऊनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

माहीमच्या बब्बन कंपाउंड परिसरात दोन हजाराहून अधिक लोकवस्ती आहे. परंतु येथील लोकवस्तीच्या तुलनेत रहिवाशांना आजही मूलभूत सुविधांपासून वंचित राहावं लागत आहे. साधारण 15 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले पालिकेचे 12 सीटर शौचालय डागडुजी न झाल्याने अखेरचा श्वास घेत आहे. या शौचालयातील 3 सीट चालू असून, 9 सीट गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद आहेत. परिणामी अवघ्या 3 सीटवर शेकडो रहिवाशांना अवलंबून रहावं लागत आहे. 

तर अनेकजण गर्दीच्या वेळी नाईलाजाने उघड्यावर रस्त्याआड नैसर्गिक विधी उरकतात. त्यामुळे परिसरात आणि शौचालयाच्या आवाराला घाणीने ग्रासले असून,सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. त्याचबरोबर शौचालयाच्या भूमिगत जीर्ण टाक्या फुटून ओसांंडून वाहत असल्याने विभागातील रहिवाशांच्या समस्येत आणखीनच भर पडली आहे. या विभागातील वस्ती वाढली मात्र सुविधा वाढल्या नाहीत.

सदरील परिसरात पालिकेच्या स्वच्छ मुंबई अभियानाचे तीन तेरा वाजले आहेत. वारंवार तक्रारी करूनही पालिका अधिकारी दखल घेत नाहीत. अशा सुस्त अधिकाऱ्यांवर प्रशासनाचा कोणताही धाक नाही का?

फ्रक्रूक इस्लाम शेख - समाजसेवक

गेल्या पंधरा वर्षांपासून शौचालयाची अवस्था दयनीय आहे. शौचालयाच्या सुशोभीकरणासाठी फंड उपलब्ध नाही. तूर्तास या शौचालयाची स्वच्छता करण्यात येईल. तसंच येत्या काही महिन्यातच या शौचालयाचे काम सुरु करण्यात येईल.
मारियाम्माल मुत्तू तेवर, नगरसेविका

संबंधित ठिकाणची तक्रार आली आहे. त्यानुसार लवकरात लवकर पाहणी करून येथील समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यात येईल.
रमाकांत बिराजदार - सहाय्यक आयुक्त, जी उत्तर

Loading Comments