Advertisement

मुंबईत उकाडा वाढला, कमाल तापमान ३७ अंशांवर

मुंबई आणि परिसरातील उकाडय़ाची तीव्रता वाढू लागली असून तापमानात एका दिवसात दोन अंशांनी वाढ झाली आहे.

मुंबईत उकाडा वाढला, कमाल तापमान ३७ अंशांवर
SHARES

मुंबई आणि परिसरातील उकाडय़ाची तीव्रता वाढू लागली असून तापमानात एका दिवसात दोन अंशांनी वाढ झाली आहे. हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्राने ३७.३ अंश सेल्सिअस कमाल, तर २०.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद केली. पहाटे हवेत असलेला काहीसा गारवा सकाळी साधारण ८ वाजल्यानंतर कमी होऊ लागला आहे. दुपारी उन्हाचे चटके मुंबई आणि परिसराला बसू लागले आहेत.

वातावरणातील दाहकता वाढल्याने नाकावर मुखपट्टी आणि डोक्यावर टोपी किंवा रुमाल घेऊन मुंबईकर बाहेर पडताना दिसत आहेत. दक्षिण मुंबईतील कमाल तापमान गेल्या काही दिवसांपासून साधारण ३४ ते ३५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान असले तरी पश्चिम आणि पूर्व उपनगरांमध्ये उन्हाची तीव्रता जाणवू लागली आहे.

बोरिवली आणि परिसरात बुधवारी ३८ अंश सेल्सिअस, चेंबूर आणि मुलुंड परिसरात ३७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. कुलाबा आणि परिसरातील कमाल तापमानात मात्र फारसा बदल झालेला नाही. बुधवारी कुलाबा येथील कमाल तापमान ३४.५ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२.३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर उष्ण वारे वाहत असून १५ मार्चनंतर तापमानात अधिक वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा