Advertisement

औषध दुकानांचा ३० मे रोजी देशव्यापी संप


औषध दुकानांचा ३० मे रोजी देशव्यापी संप
SHARES

औषधांच्या उत्पादन-खरेदी-विक्रीवर अंकुश ठेवत बेकायदा उत्पादन-खरेदी-विक्रीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने ई-पोर्टलचा डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ई-पोर्टलसंबंधीची प्रक्रिया केंद्राकडून सुरू आहे. मात्र या ई-पोर्टलला ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने जोरदार विरोध केला आहे. ई-पोर्टल व्यवहार्य नसून त्यामुळे केमिस्टला फटका बसणार असल्याचे म्हणत असोसिएशनने 30 मे रोजी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. यात महाराष्ट्र राज्य केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचाही सहभाग असणार आहे. त्यानुसार 30 मे रोजी देशभरातील साडे आठ लाख औषध दुकाने बंद राहतील, अशी माहिती महाराष्ट्र राज्य केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे सरचिटणीस अनिल नावंदर यांनी दिली आहे.

ई-पोर्टलसंबंधी केंद्राने नुकत्याच सूचना-हरकती मागवल्या असून त्यानंतर या सूचना आणि हरकतींचा विचार करत ई-पोर्टल तयार करण्यात येणार आहे. हे ई-पोर्टल लागू झाल्यास कंपन्यांपासून ते विक्रेत्यांपर्यंत सर्वाना औषधांच्या संबंधीची सर्व माहिती, अगदी रुग्णांच्या हातात औषधे जाईपर्यंतच्या प्रवासाची माहिती ई-पोर्टलमध्ये नोंदवणे बंधनकारक असणार आहे. जनआरोग्य चळवळीकडून या निर्णयाचे स्वागत होत असले, तरी औषध विक्रेत्यांनी, केमिस्टनी मात्र या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त करत त्याला विरोध केला आहे. ग्रामीण भागातील औषध विक्रेत्यांना ई-पोर्टलवर ही माहिती नमूद करणे शक्य होणार नाही. यात अनेक तांत्रिक अडचणीही असल्याचे म्हणत केमिस्ट संघटनेने ई-पोर्टलचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे.


काय आहे हे ई पोर्टल, हे वाचा:

औषध उत्पादन-खरेदी-विक्रीवर आता ई-अंकुश


या पार्श्वभूमीवर केमिस्ट संघटनेने 30 मे च्या संपाची हाक दिली आहे. त्यानुसार या संपात देशभरातील साडे-आठ लाख औषध विक्रेते आणि 50 लाख कर्मचारी सहभागी होणार असल्याचेही नावंदर यांनी सांगितले आहे. संपामुळे रुग्णांना होणाऱ्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करत रुग्णांना संपाच्या आदल्या दिवशी आवश्यक ती औषध खरेदी करावी असे आवाहनही संघटनेकडून करण्यात आले आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा