Advertisement

शिकाऊ डॉक्टरांना महापालिका रुग्णालयातील सेवा सक्तीची?


शिकाऊ डॉक्टरांना महापालिका रुग्णालयातील सेवा सक्तीची?
SHARES

महापालिकेच्या केईएम, शीव आणि नायर या तीन रुग्णालयांत वैद्यकीय महाविद्यालय चालवलं जातं आणि यासर्व रुग्णालयांमध्ये पुरेसे भूलतज्ज्ञ (ऍनेस्थेशिया) डॉक्टर नसल्याने खासगी डॉक्टरांची सेवा घेतली जात आहे. पण बऱ्याच वेळा हे भूलतज्ज्ञ उपलब्ध होत नसल्याने शस्त्रक्रियाही रद्द केल्या जात आहेत. त्यामुळे भूलतज्ज्ञांची पदे त्वरीत भरली जावीत आणि महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या डॉक्टरांना किमान दोन वर्षे महापालिकेच्या रुग्णांलयांमध्ये सेवा देणे बंधनकारक करावे, अशी मागणी स्थायी समिती सदस्यांनी केली.

महापालिकेच्या १७ उपनगरीय रुग्णालयांमध्ये पुरवण्यात येणाऱ्या बधिरीकरण आणि रेडीओलॉजी सेवेबाबत खासगी डॉक्टरांना देण्यात येणाऱ्या शुल्काचे दर वाढवण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीला आला होता.


या प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी

नित्य स्वरुपाच्या लहान शस्त्रक्रियेसाठी एक हजार रुपये
मोठ्या शस्त्रक्रियेसाठी दीड हजार रुपये
तात्काळ स्वरुपाच्या लहान शस्त्रक्रियेसाठी दोन हजार रुपये
मोठ्या स्वरुपाच्या शस्त्रिक्रियेसाठी अडीच हजार रुपये
सुट्टीच्या काळात ही सेवा बजावल्यास त्यांना दोन हजार रुपये शुल्क
नित्य स्वरुपाच्या मेजर केसेसमधील शस्त्रक्रियेसाठी अडीच हजार रुपये
तात्काळ स्वरुपाच्या शस्त्रक्रियेसाठी तीन हजार रुपये

भूलतज्ज्ञांना शुल्क वाढवून दिल्यामुळे शिवसेनेच्या नगरसेविका राजुल पटेल यांनी प्रशासनाचे आभार मानले. आजवर या भूलतज्ज्ञांना ५०० रुपये मिळत असल्याने बऱ्याचदा ते उपलब्ध होत नसत. त्यामुळे अनेकदा रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी उपाशी ठेवल्यानंतर केवळ हे भूलतज्ज्ञ नसल्याने शस्त्रक्रिया रद्द करण्याचे प्रकार घडले आहेत. मात्र, यासाठी खासगी डॉक्टरांची सेवा घेण्यापेक्षा आपल्याच तीन वैद्यकीय महाविद्यालयातील रेडीओलॉजी विभागाच्या शिकाऊ डॉक्टरांना दोन वर्षे का बंधनकारक करण्यात येत नाही, असा सवाल करत जो शिकाऊ डॉक्टर महापालिकेत सेवा बजावण्यास नकार देईल, त्याचे प्रमाणपत्र वैद्यकीय महाविद्यालयाने रोखून धरावे, अशी सूचना केली.


रुग्णालयांमध्ये सेवा देणे बंधनकारक करा

याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी पाठिंबा देऊन, आपण अल्पदरात या वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण द्यायचे आणि त्यांनी खासगी रुग्णालयांमध्ये सेवा द्यायची याला कुठेतरी लगाम लागायला हवा. यासाठी आपल्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्यांना महापालिका रुग्णालयांमध्ये सेवा देणे बंधनकारक करावे, अशी सूचनाही त्यांनी केली. 

प्रभाकर शिंदे यांनीही याला पाठिंबा देत आपल्या शिकावू डॉक्टरांकडून ही सेवा घेऊन त्यांना प्रोत्साहन द्यावे, अशी सूचना केली. यावर महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये भूलतज्ज्ञांची कमतरता असल्याने खासगी डॉक्टरांची सेवा घेतली जात असल्याचं अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी स्पष्ट केलं. मात्र, याबाबत शासन निर्णय घेऊ शकते, महापालिकेला हे अधिकार नसल्याचं त्यांनी सांगितलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा