Advertisement

गणेशोत्सवात मेट्रोचं बॅरिकेट्स मागे सरकवणार


गणेशोत्सवात मेट्रोचं बॅरिकेट्स मागे सरकवणार
SHARES

गणरायांचं आगमन निर्विघ्न पार पडावं यासाठी मुंबई महापालिका आणि एमएमआरडीएने संयुक्तपणे कंबर कसली आहे. या मेट्रो रेल्वेच्या कामांमुळे गणेशोत्सवात कोणत्याही प्रकारच्या अडचणी भक्तांना होऊ नयेत यासाठी मेट्रो रेल्वेचे बॅरिकेट्स मागे सरकवलं जाणार आहे. जिथे शक्य असेल, तिथे बॅरिकेट्स मागे घेतले जातील, असं आश्वासन एमएमआरडीएने महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीला दिले आहे.


'या सभेला उपस्थित राहा'

गणेशोत्सव काळात रस्त्यांवरील खड्डे तसंच इतर बाबींचा आढावा घेण्यासाठी मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या मागणीनुसार महापौर आणि पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या सभांमध्ये एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी गैरहजेरी लावली होती. मुंबईत सध्या मेट्रो रेल्वेच्या कामांमुळे आणि त्यामुळे निर्माण झालेले खड्डे यामुळे गणेशोत्सवात मंडळांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागणार असल्यानं एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी या सभेला उपस्थित राहावं, अशी मागणी गणेशोत्सव समन्वय समितीने केली होती.


मेट्रोच्या कामाची पाहणी

समन्वय समितीच्या मागणीनुसार शहरात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामाची पाहणी रविवारी सकाळी झाली. यामध्ये महापालिकेच्या सार्वजनिक उत्सवाचे समन्वयक उपायुक्त नरेंद्र बर्डे, सी विभागाचे सहायक आयुक्त सुनील सरदार, डी. विभागाचे सहायक आयुक्त विश्वास मोटे, जी- उत्तर विभागागाचे सहायक आयुक्त अशोक खैरनार यांच्यासह मेट्रो रेल्वेचे अधिकारी आणि पोलिस वाहतूक पोलिस अधिकारी आणि गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर, कार्याध्यक्ष कुंदन आगासकर, प्रमुख कार्यवाह गिरीश वालावलकर आदी उपस्थित होते.


विसर्जन मार्गांचीही पाहणी

यावेळी मेट्रोबाधित मार्गाची पाहणी करण्यात आली. गिरगावमधील जगन्नाथ शंकरशेठ रोड, ठाकूरद्वार, लॅमिग्टन रोड, ग्रँटरोड, गिल्डर टँक मैदान, मुंबई सेंट्रल, नायर हॉस्पिटल, जेकब सर्कल, वरळी नाका, डॉ. ऍनी बेझंट रोड, दादरचे गोखले रोड, रानडे रोड, माहिम शितलादेवी मार्ग आदी गणपतींचे आगमन आणि विसर्जन मार्गांची पाहणी केली आहे. याच मार्गांवर सध्या मेट्रो रेल्वेचं काम सुरू आहे.

गणपतीच्या आगमन आणि विसर्जनादरम्यान २२ ते २४ फुट रुंदीच्या रस्त्यांची गरज भासणार असून ज्या रस्त्यावर मेट्रोचं काम चालू आहे, त्याच रस्त्याने आगमन आणि विसर्जन होऊ शकेल, अशी खात्री मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

विशेष म्हणजे त्यासाठी जिथं जिथं बॅरिकेट्स टाकलेले आहे, ते बॅरेकेट्स मागे सरकवले जातील, असंही आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्याचं सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी दिली आहे.


गणपतीचं आगमन सुट्टीच्या दिवशी

एवढंच नाही तर बॅरिकेट्स मागे घेतल्यानंतर जे खड्डे पडले असतील तेही बुजवून दिले जातील, असंही आश्वासन मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दिल्याचं नरेश दहिबावकर यांनी सांगितलं. येत्या २६ ऑगस्ट आणि त्यापुढे सुट्टीच्या दिवशी गणपतीचं आगमन होणार असल्याची कल्पना मेट्रो अधिकारी आणि वाहतूक पोलिसांना देण्यात आली. त्यावेळी शक्य असेल त्या जागी वाहतूक विभाग रस्ता एकमार्गी करेल, असं आश्वासन त्यांनी दिलं असून गणेशोत्सव मंडळांना विनंती करून आपलं गणपतीचं आगमन शक्यतो सुट्टीच्या दिवशी केली जावी, असंही आवाहन केल्याचं दहिबावकर यांनी स्पष्ट केलं.


'यासाठी बॅरेकेट्स मागे सरकवणार'

गणेशोत्सव दरम्यान नागरिकांना आणि भाविकांना कोणत्याही प्रकारच्या त्रासाला तसेच अडचणींना सामोरं जावू लागू नये यासाठी हे बॅरेकेट्स मागे सरकवले जाण्याची सूचना समन्वय समितीने केली होती. त्यानुसार गरजेनुसार आणि आवश्यकता असेल त्या रस्त्यांवरील मेट्रोचे बॅरेकेट्स मागे सरकवण्याची तयारी मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दर्शवली असल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त नरेंद्र बर्डे यांनी दिली आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा