अतिधोकादायक इमारती : आठवड्याभरात रहिवाशांचे स्थलांतर

  Mumbai
  अतिधोकादायक इमारती : आठवड्याभरात रहिवाशांचे स्थलांतर
  मुंबई  -  

  पावसाळा सुरू होऊन बरेच दिवस उलटले तरी दक्षिण मुंबईतील अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतीतील रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरीत करण्याची जबाबदारी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळाने पार पाडलेली नाही. त्यामुळे अजूनही 218 रहिवासी मृत्यूच्या सावटाखाली जगत आहेत.


  दुरूस्ती मंडळाची ग्वाही

  'मुंबई लाइव्ह'ने काही दिवसांपूर्वी यासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याचा पाठपुरावा केला असता 218 रहिवाशांपैकी एकालाही संक्रमण शिबिरात स्थलांतरीत केले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याचवेळी दुरूस्ती मंडळाने मात्र येत्या आठवड्याभरात अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांच्या स्थलांतराचा प्रश्न निकाली काढण्याचा निर्णय घेतला आहे.

  गरज पडल्यास पोलिसबळाचा वापर करत, वीज, पाणी तोडत आठवड्याभरात रहिवाशांना स्थांतरीत करु, अशी ग्वाही दुरूस्ती मंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.


  218 रहिवाशांची जबाबदारी

  दरवर्षीप्रमाणे दुरूस्ती मंडळाने मे महिन्याच्या अखेरीस अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची यादी जाहीर केली. त्यानुसार 9 इमारती अतिधोकादायक आहेत. या 9 इमारतीत 500 रहिवासी रहात असले तरी दुरूस्ती मंडळावर केवळ 218 रहिवाशांना स्थलांतरीत करण्याची जबाबदारी आहे.

  कारण 'एक्सप्लेन्ड मेन्शन' या अतिधोकादायक इमारतीचा प्रश्न न्यायालयात गेला आहे. तर इतर एक-दोन इमारतींचा पुनर्विकास होणार असल्याने तेथील रहिवाशांच्या स्थलांतराची जबाबदारी विकासकाची असणार आहे.

  त्यानुसार 218 रहिवाशांना स्थलांतरीत करण्याची जबाबदारी दुरूस्ती मंडळावर असून गृहनिर्माण मंत्री आणि गृहनिर्माण राज्यमंत्री यांच्या उपस्थितीत मंडळाने जूनच्या पहिल्या आठवड्यात सर्व रहिवाशांचे स्थलांतर करण्याचे आश्वासन दिले होते.


  जुलै उजाडला

  मात्र जून संपून जुलै सुरू झाला तरी 218 रहिवासी मृत्यूच्या सावटाखालीच असून मंडळाकडून केवळ नोटीसा पाठवण्याचेच काम सुरू आहे. वीज, पाणी तोडण्यासंबंधीच्या नोटीसा पाठवल्यानंतरही रहिवासी स्थलांतरीत होण्यास तयार नसल्याचे चित्र आहे.

  त्यामुळे मंडळाला आता जबरदस्तीने या रहिवाशांना स्थलांतरीत करावे लागणार असल्याचे म्हटले जात आहे. पण हे कधी करणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे. कारण यादरम्यान एखादी दुर्घटना झाली तर त्याला जबाबदार कोण? हा मोठा प्रश्न असेल.


  गोराईत का जायचे?

  या 218 रहिवाशांसाठी गोराई येथील संक्रमण शिबिरातील गाळे राखीव ठेवण्यात आले आहेत. दुरूस्ती मंडळाकडे मुंबई शहरात संक्रमण शिबिरेच उपलब्ध नसल्याने या रहिवाशांना उपनगरात स्थलांतरीत करावे लागत आहे.

  मुळात एकदा का म्हाडाच्या संक्रमण शिबिरात गेलो की पुन्हा कधी हक्काच्या घरात येणार याचे उत्तर कुणाकडे नसल्याने, याआधीचे रहिवासी 30-35 वर्षांपासून संक्रमण शिबिरात राहत असल्याचे वास्तव असल्याने रहिवाशी संक्रमण शिबिरात जाण्यास नकार देतात.

  त्यात या रहिवाशांना आता थेट दक्षिण मुंबईतून गोराईत उचलून टाकण्यात येत असल्याने रहिवाशांना यास स्पष्ट नकार दिला आहे. मृत्यूच्या सावटाखाली जगू पण संक्रमण शिबिराचा नरक नको, असे म्हणत रहिवाशी संक्रमण शिबीर नाकारत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


  मुंबईत घरे द्या

  गिरणी कामगारांच्या प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर संक्रमण शिबिरे आहेत. मात्र या संक्रमण शिबिरांमध्ये घुसखोरी झाल्याची दाट शक्यता आहेत. त्यामुळे या घुसखोरांना काढून रहिवाशांना संक्रमण शिबिरे उपलब्ध करून द्यावीत.


  शहरात अधिकाधिक संक्रमण शिबिरे कशी उपलब्ध होतील, यासाठीही म्हाडाने प्रयत्न करावेत. कारण शाळा, काॅलेज आणि रोजगार जिथे असतो तिथून दुसरीकडे कुठेतरी अचानक जाणे कुणासाठीही अवघडच असते. त्यामुळे शक्य तितक्या लवकरच शहरातही संक्रमण शिबिरे उपलब्ध होणे गरजेचे आहे.
  अभिजीत पेठे, अध्यक्ष, ट्रान्झिट कॅम्प असोसिएशन


  हे देखील वाचा -

  म्हाडाचा दावा फोल...अजूनही 218 रहिवासी मृत्यूच्या सावटाखाली

   

  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.