दक्षिण मुंबईतील 9 उपकर प्राप्त इमारती अतिधोकादायक

 Mumbai
दक्षिण मुंबईतील 9 उपकर प्राप्त इमारती अतिधोकादायक

दरवर्षीप्रमाणे म्हाडाच्या मुंबई इमारत आणि दुरूस्ती मंडळाकडून दक्षिण मुंबईतील अतिधोकादायक उपकर प्राप्त इमारतींची यादी गुरूवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार 9 उपकर प्राप्त इमारती अतिधोकादायक असल्याची माहिती गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. या इमारतीतील रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरीत होण्याबाबतच्या नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत. तर जे रहिवासी जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत स्थलांतरीत होणार नाहीत, त्यांना पोलिस बंदोबस्तात स्थलांतरीत करण्यात येईल, असेही वायकर यांनी यावेळी सांगितले.

गेल्या वर्षी 11 अतिधोकादायक इमारती होत्या. तर यंदा हा आकडा नऊवर आला आहे. यंदाच्या अतिधोकादायक इमारतींच्या यादीत गेल्या वर्षीच्या 6 अतिधोकादायक इमारतींचा समावेश असून, तीन नव्या इमारतींचा समावेश झाल्याची माहिती दुरूस्ती मंडळाचे मुख्य अधिकारी सुमंत भांगे यांनी दिली आहे. या 9 इमारतींमध्ये 247 निवासी तर 253 अनिवासी असे एकूण 500 रहिवासी आहेत. 9 पैकी 2 इमारतींना पुनर्विकासासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आल्यानं लवकरच या इमारतींचा पुनर्विकास होणार आहे. तर 'एक्स्पेन्ड मेशन' इमारतीसह अन्य एका इमारतीचा वाद न्यायालयात गेला आहे. त्यामुळे 500 पैकी 218 रहिवाशांच्या स्थलांतराची जबाबदारी दुरूस्ती मंडळावर आहे. या रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरीत करण्यासाठी आवश्यक ते गाळे उपलब्ध करण्यात आल्याचेही भांगे यांनी स्पष्ट केले आहे.

एकदा का म्हाडाच्या संक्रमण शिबिरात गेले की पुन्हा हक्काच्या घरात कधी येणार याची शाश्वती नसते. 40 वर्षांपासून संक्रमण शिबिरात राहणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. त्यामुळेच रहिवासी अतिधोकादायक इमारतीत जीव मुठीत घेऊन राहणे पसंत करतात. पण संक्रमण शिबिरात जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे संक्रमण शिबिरार्थींचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठीही धोरण निश्चित करण्यात येत असल्याचे यावेळी वायकर यांनी सांगितले आहे.


अतिधोकादायक इमारतींची नावे पुढील प्रमाणे -

अ - इमारत क्रमांक 144, एम. जी. रोड, एक्स्प्लेन्ड मेन्शन
बी-1 इमारत क्र. 208-220, काझी सय्यद स्ट्रीट
बी-1 इमारत क्र. 55-57, नागदेवी क्रॉस लेन
सी-1 इमारत क्र. 44-46, काझी स्ट्रीट, 90-94-102, मस्जीद स्ट्रीट
सी-1 इमारत क्र. 101-111, बारा इमाम रोड
सी-2 इमारत क्र. 174-190,125-133, के. ए. शर्मा मार्ग, मुंबई-02, गोपाळ निवास
सी-3 इमारत क्र. 30-32, 2 री सुतारगल्ली
डी-3 इमारत क्र. 39, चौपाटी, सी फेस
ई.-2 इमारत क्र. 46-50, लकी मेन्शन क्लेअर रोड

Loading Comments