मुंबईतल्या 617 इमारती धोकादायक

  Mumbai
  मुंबईतल्या 617 इमारती धोकादायक
  मुंबई  -  

  महापालिकेने मान्सूनपूर्व केलेल्या पाहणीत मुंबईतील तब्बल 617 इमारती, चाळी धोकादायक असल्याचे आढळून आल्या आहेत. या सर्व इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना घर खाली करण्याची नोटीस महापालिका प्रशासनाने दिली आहे. या 617 धोकदायक इमारतींपैकी एकट्या कुर्ला विभागातच 111 धोकादायक इमारती आहेत. या सर्व अतिधोकादायक इमारतींच्या छताखाली मुंबईकर जीव मुठीत धरून रहात आहेत. या इमारती खाली न केल्यास त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्याच्या हालचाली महापालिकेने सुरू केल्या आहेत.

  मुंबईतील 24 विभाग कार्यालयांमधील अतिधोकादायक इमारतींची यादी महापालिका प्रशासनाने जाहीर केली आहे. या सर्व इमारती 'सी' 1 प्रवर्गात असून या सर्व इमारती जमिनदोस्त करणे आवश्यक आहे. या इमारती दुरुस्तीपलिकडील असल्यामुळे पावसाळ्यात या इमारती अथवा चाळी कोसळून दुघर्टना होण्याची भीती आहे. त्यामुळे ही घरे त्वरीत रिकामी करण्यात यावी. अन्यथा तेथील वीज व पाणी पुरवठा खंडित करण्यात येईल, असे प्रशासनाने जाहीर केले आहे.

  लालबागची गणेश सिनेमाची इमारत धोकादायक -
  परळ, लालबागमधील गणेश चित्रपटगृहाची इमारत मोडकळीस आल्याने जुन्या चित्रपटांचा सुवर्णकाळ अनुभवलेली ही वास्तू नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. सध्या या चित्रपटगृहाच्या इमारतीत गणेशमूर्ती बनवल्या जातात. परंतु ही इमारत अतिधोकादायक ठरल्यामुळे त्वरीत खाली करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. गोकुळाष्टमीच्या दिवशी लालबाग-परळमधील मुले गणेश सिनेमागृहात जावून चित्रपट पाहायचे आणि त्यानंतरच दहिहंडी फोडायचे, अशा येथील असंख्य आठवणी आहेत. दादर पूर्वेकडील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन आणि करीरोडमधील कामगार स्वसदन ही इमारतही धोकादायक ठरली आहे.  अतिधोकादायक इमारतींची संख्या प्रभाग निहाय :

  ए विभाग :05
  जी-उत्तर विभाग : 11
  आर-मध्य विभाग : 30
  बी विभाग : 04
  एच पूर्व विभाग : 12
  आर-उत्तर विभाग : 10
  सी विभाग :03
  एच पश्चिम विभाग : 27
  एल विभाग : 111
  डी विभाग : 05
  के-पूव विभाग : 34
  एम-पूर्व विभाग : 10
  ई विभाग : 11
  के-पश्चिम : 29
  एम-पश्चिम विभाग : 13
  एफ-दक्षिण विभाग : 28
  पी-दक्षिण विभाग : 16
  एन विभाग : 63
  एफ-उत्तर विभाग : 60
  पी-उत्तर विभाग : 45
  एस विभाग : 12
  जी-दक्षिण विभाग :15
  आर-दक्षिण विभाग : 17
  टी विभाग : 31


  मालमत्ता विभागाच्या ताब्यातील इमारती : 15


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.