कोरोना संकटामुळे लागू करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे आपापल्या मूळ गावी गेलेले परप्रांतीय मजूर पुन्हा एकदा मुंबईची वाट धरू लागले आहेत. उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालहून मुंबईकडे येणाऱ्या विशेष रेल्वे गाड्या (Migrant laborers from UP Bihar and West Bengal are returning to Maharashtra and Mumbai) पुन्हा एकदा भरून येऊ लागल्या आहेत.
रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार सद्यस्थितीत नियमितपणे धावणाऱ्या सर्व एक्स्प्रेस, मेल, लोकल गाड्या कोरोना संकटामुळे बंद ठेवण्यात आल्या आहेत. केवळ विशेष ट्रेनच धावत आहेत. नियमित रेल्वे सुरू करण्याची स्थिती नसताना रेल्वेकडून फारतर विशेष ट्रेनची संख्या वाढवण्यात येईल. कोरोनाचा प्रादुर्भाव आणि राज्य सरकारकडून होणारी मागणी यावर प्रामुख्याने या ट्रेनची संख्या अवलंबून असेल.
मुंबई, दिल्ली आणि गुजराहून आपापल्या राज्यांत गेलेले परप्रांतीय मजूर पुन्हा एकदा शहरांमध्ये परतू लागलेले आहेत. उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालहून मुंबई, दिल्ली आणि गुजरातच्या दिशेने चालवण्यात येणाऱ्या विशेष ट्रेनमध्ये आता मागील काही दिवसांच्या तुलनेत गर्दी होऊ लागली आहे. तर या मोठ्या शहरांमधून परतीच्या प्रवासात बहुतांश ट्रेन या रिकाम्याच येत आहेत.
हेही वाचा- मनसेची भूमिका, परप्रांतीय मजूर पुन्हा महाराष्ट्रात येणार असतील तर…
याचाच स्पष्ट अर्थ असा आहे की, मुंबई, दिल्ली, गुजरातहून बाहेर जाणाऱ्या प्रवाशांच्या तुलनेत शहरात येणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे आणि यातील बहुतेक प्रवासी हे परप्रांतीय मजूरच आहेत. हे वेगळं सांगायला नको. प्रवाशांची वाढलेली संख्या एकप्रकारे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक संकेतच मानावा लागेल, असंही विनोद कुमार म्हणाले.
लवकरच विशेष ट्रेनच्या संख्येतही वाढ होऊ शकते, यावर सध्या राज्य सरकारांसोबत चर्चा सुरू आहे. प्रवाशांची मागणी, त्यांची संख्या आणि कोरोनाची स्थिती बघूनच पुढील निर्णय घेण्यात येईल. सध्या ज्या विशेष ट्रेन सुरू आहेत, त्या सुरूच राहतील. या विशेष ट्रेनपैकी २३० ट्रेनमध्ये आसनांच्या क्षमतेच्या ७८ टक्के प्रवासी प्रवास करत आहेत. तर ४३ ट्रेनमध्ये ७५ ते १०० टक्के प्रवासी प्रवास करत आहेत. २७ ट्रेनमध्ये ५० ते ७५ टक्के आणि २९ ट्रेनमध्ये ३० ते ५० टक्के प्रवासी प्रवास करत आहेत.
लाॅकडाऊन सुरू झाल्यापासून २५ जूनपर्यंत ४५९४ श्रमिक विशेष ट्रेन चालवण्यात आल्या आहेत. ज्यातून ६२.८ लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. सद्यस्थितीत केवळ २ श्रमिक विशेष ट्रेन चालवण्यात येत असून आता कुठल्याही राज्यांकडून या ट्रेनची मागणी होत नाहीय. मागणी केल्यास ट्रेन उपलब्ध करून दिल्या जातील, असंही विनोद कुमाार यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा- पश्चिम रेल्वेवर ४० फेऱ्या वाढवण्याचा निर्णय, अनेकांना दिलासा