मच्छिमारांना मिळणार आरोग्यदायी सुविधा

 Mumbai Port Trust
मच्छिमारांना मिळणार आरोग्यदायी सुविधा
Mumbai Port Trust  -  

भाऊचा धक्का, माझगाव डॉक आणि रे रोड शिपिंग यार्ड परिसरात दररोज हजारोंच्या संख्येने मच्छिमार आणि कामगार कार्यरत असतात. अत्यंत वर्दळीच्या या परिसरात रोज मासे, टाकाऊ पदार्थ, रस्त्यावर सांडणाऱ्या इंधनामुळे अस्वच्छता पसरते. यामुळे स्थानिक, मच्छिमार आणि कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत पशुसंवर्धन, मत्स्यविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी या भागाची नियमित स्वच्छता करण्यासोबतच मच्छिमारांना आवश्यक शीतगृह, बोट पार्किंगची जागा देण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले आहेत.

भाऊचा धक्का येथील मच्छीमार आणि वाहतूकदार यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या मंत्रालयातील दालनात गेल्या आठवड्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली होती. या बैठकीत दिलेल्या आश्वासनानुसार खोतकर आणि शिव वाहतूक सेनेचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी भाऊचा धक्का, माझगाव डॉक इ. भागांची पाहणी केली.

रे रोड शिपिंग यार्ड परिसरातील अस्वच्छता, रस्त्यावर सांडणाऱ्या इंधनामुळे कामगार आणि रहिवाशांच्या आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेऊन खोतकर यांनी परिसरात नियमित साफसफाई करण्याच्या सूचना महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या.

तसेच, या ठिकाणी रुग्णवाहिका आणि वैद्यकीय सुविधा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अत्याधुनिक शीतगृहे, बोट पार्किंगकरिता जागेचा विस्तार अथवा पर्यायी जागेची व्यवस्था, परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती आणि भोजनगृह या सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

Loading Comments