Advertisement

कचरा कंत्राटाचे चुकीचे अंदाजपत्रक, अधिकाऱ्यांची होणार चौकशी


कचरा कंत्राटाचे चुकीचे अंदाजपत्रक, अधिकाऱ्यांची होणार चौकशी
SHARES

मुंबईत निर्माण होणारा कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट कांजूर मार्ग आणि देवनार डम्पिंग ग्राऊंडवर लावण्यासाठी कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे. परंतु आर मध्य व उत्तर विभागासाठी निवडण्यात आलेल्या कंत्राटदाराने तब्बल ९७ टक्के अधिक दराने बोली लावून काम मिळवले आहे. परंतु महापालिकेचे अंदाजपत्रक चुकीचे बनवल्याने हा दर अधिक वाटत आहे. त्यामुळे चुकीचे अंदाजपत्रक बनवणाऱ्या घनकचरा विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांची चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहे.


प्रायोगिक तत्वावर कंत्राट

महापालिककडून आर दक्षिण, आर मध्य व उत्तर आणि टी या चार विभागांच्या कचरा कंत्राटाचे खासगीकरण करण्यात येत आहे. प्रायोगिक तत्त्वावर चार विभागांमध्ये कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांसह त्यासाठी लागणारे कामगार आणि सार्वजनिक कचरा कुंड्या काढून टाकून सोसायट्यांना कचरा कुंड्या उपलब्ध करून देण्याचे कंत्राट देण्यात येत आहे.


ए. जी. एनव्हायरो कंपनीला कंत्राट

आर मध्य व उत्तर या विभागांसाठी ए. जी. एनव्हायरो इन्फ्रा प्रा.लि. या कंपनीला सात वर्षांकरता २६९.३७ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात येत आहे. परंतु, महापालिकेने निश्चित केलेल्या अंदाजापेक्षा ९७.६२टक्के अधिक दराने हे कंत्राट दिले आहे. त्यामुळे अंदाजपत्रक चुकीचे बनवल्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे.


प्रतिटनाच्या दरावरून गोंधळ

या प्रकरणात कंत्राटदाराने लावलेल्या बोलीचे दर हे नवी दिल्ली आणि नवी मुंबईच्या दरांच्या बरोबरीत आहे. महापालिकेने प्रति टनाचा दर हा १२०० ते १३०० रुपये दर्शवला होता. त्या तुलनेत कंत्राटदाराने २३२५ रुपयांचा दर आकारला आहे. कंत्राटदाराने आधी २५५० रुपयांचा दर आकारला होता. परंतु, वाटाघाटी केल्यानंतर तो दर २३२५ एवढा केलेला आहे. हे दर गृहीत धरून महापालिकेने सुधारीत अंदाजपत्रक बनवले.


अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

सुधारीत अंदाजपत्रकापेक्षा कंत्राटदाराचा दर हा १.१३ टक्के अधिक आहे. मात्र, यापूर्वी बनवलेल्या चुकीच्या अंदाजपत्रकाबाबत संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांनी हा दर कशाच्या आधारे निश्चित करून अंदाजपत्रक बनवले आहे? याचा खुलासा करण्यास सांगितले आहे. याप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी स्पष्ट केले.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा