Advertisement

मेट्रो-३ प्रकल्पातून एमएमआरसी कमावणार पैसा?


मेट्रो-३ प्रकल्पातून एमएमआरसी कमावणार पैसा?
SHARES

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गावरून बराच वाद सुरू असून आरे कार डेपोच्या जागेचा व्यावसायिक वापर करत मुंबई मेट्रो रेल काँर्पोरेशन (एमएमआरसी) आपली तिजोरी भरणार असल्याचा आरोप होत आहे. असं असताना एमएमआरसीने शुक्रवारी एक निविदा प्रसिद्ध केली असून या निविदेनुसार मेट्रो-३ प्रकल्पातून तिकिटाव्यतिरिक्त अन्य पर्यायातून कसा महसूल मिळवता येईल, याचा अभ्यास करण्यासाठी कंपनीची नियुक्ती करण्यात येणार आहे. या निविदेमुळे मेट्रो-३ प्रकल्पाअंतर्गत सुपरफास्ट वाहतूक व्यवस्था पुरवण्याबरोबरच त्यातून एमएमआरसीची तिजोरी कशी फुगेल, याचीही व्यवस्था करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे.



स्थानकं, प्लॅटफाॅर्मचा व्यावसायिक वापर

३३ किमी. लांबीच्या भुयारी मेट्रो मार्गातील स्थानकं, प्लॅटफाॅर्म, मेट्रो गाड्यातील आतील-बाहेरील भाग यांचा व्यावसायिक वापर करून अधिकाधिक महसूल कसा मिळवता येईल, याचा अभ्यास करण्यासाठी ही निविदा मागवण्यात आली आहे. मेट्रो प्रकल्पातील जागेचा व्यावसायिक विकास केला जाणार असून यातूनही कशाप्रकारे महसूल मिळवता येईल, याचाही अभ्यास करण्यात येणार आहे. मेट्रो-३ मध्ये अशा काही वेगळ्या सुविधा पुरवता येतील की ज्यातूनही एमएमआरसीची तिजोरी फुगेल, याचाही प्रयत्न केला जाणार आहे.


पर्यावरण प्रेमींचे टीकास्त्र

एमएमआरसीची ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर मेट्रो-३ ला विरोध करणाऱ्या पर्यावरण प्रेमींनी यावर कडाडून टीका केली आहे. आरे कार डेपोची जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा आरोप वनशक्ति, सेव्ह आरे आणि सेव्ह ट्रीकडून सुरूवातीपासूनच होत आहे. तर यासंबंधीची कागदपत्रंही सेव्ह आरे तसेच वनशक्ति संघटनांकडून सादर केली आहेत. एमएमआरसीनं मात्र वेळोवेळी हे आरोप फेटाळले आहेत. पण आता या निविदेच्या माध्यमातून एमएमआरसीचा खरा चेहरा समोर आला असून मेट्रो-३ मार्ग हा केवळ पैसा कमावण्याचा मार्ग असल्याची प्रतिक्रिया सेव्ह ट्रीचे सदस्य झोरू बाथेना यांनी देत नाराजी व्यक्त केली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा