Advertisement

वडाळ्यात एमपीटीची मनमानी, जे. के. नॉलेज सेंटरचे प्रवेशद्वार केले बंद


वडाळ्यात एमपीटीची मनमानी, जे. के. नॉलेज सेंटरचे प्रवेशद्वार केले बंद
SHARES

कुठलीही पूर्वसूचना न देता मुंबई पोर्ट ट्रस्ट प्रशासनाने वडाळा पूर्वेकडील नाडकर्णी पार्क येथील जे. के. नॉलेज सेंटर या शैक्षणिक संकुलाचे मुख्य प्रवेशद्वार बंद केले आहे. पोर्ट ट्रस्टच्या सुरक्षा रक्षकांनी दमदाटी करून 6 जूनपासून प्रवेशद्वार बंद केल्याने येथे शिक्षण घेणाऱ्या 4 हजार 500 विद्यार्थ्यांसहित शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना धोकादायक व असुरक्षित मार्गावरून संकुलात प्रवेश करावा लागत आहे. पोर्ट ट्रस्टच्या या मनमानीविरोधात विद्यार्थी, पालक व नॉलेज सेंटरमधील शिक्षक, कर्मचाऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

साडेचार हजार विद्यार्थी घेतात शिक्षण-
वडाळा पूर्वेकडील नाडकर्णी पार्क येथील मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेत कामगारांच्या मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी 14 वर्षांपूर्वी नॉलेज सेंटर हे शैक्षणिक संकुल बांधण्यात आले. येथे कामगारांच्या मुलांसहित परिसरातील 4 हजार 500 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सकाळी 7 च्या पहिल्या तासाला हजर राहण्यासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथून येणारे विद्यार्थी सकाळी 6.30 ते 6.45 वाजेदरम्यान महाविद्यालयात येतात. तर रात्री 9 वाजेपर्यंत एमबीए, बीएडचे विद्यार्थी येथे शिक्षण घेतात.

पूर्वसूचना न देताच प्रवेशद्वार बंद -
मुंबई पोर्ट ट्रस्टने 6 जूनपासून संकुल चालकाला कोणतीही पूर्वसूचना न देता महाविद्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करत संकुलाच्या मागील प्रवेशद्वाराचा वापर करण्याचे निर्देश दिले. परंतु संकुलाचे मागील प्रवेशद्वार असुरक्षित व अतिधोकादायक भागात असून येथून अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणवर वाहतूक होते.

पर्यायी मार्गावर चोर, गर्दुल्ल्यांचा वावर -
टिंबर कॉलनीतून संकुलात येणाऱ्या मार्गावर चोर आणि गर्दुल्ले ठाण मांडून बसलेले असतात. यामुळे या मार्गावरुन प्रवास करणे विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी धोक्याचे असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. बीपीटी कंटेनर रोडवरून अवजड वाहनांची ये-जा सुरु असते. त्यामुळे बीपीटी प्रशासनाने महाविद्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार विदयार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसाठी लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी मनसे शाखा अध्यक्ष संजय रणदिवे यांनी केली आहे.

महाविद्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यापूर्वी कोणतीही पूर्व सूचना एमपीटी प्रशासनाच्या सुरक्षा विभागाने महाविद्यालयाला दिली नाही. अचानक टाळे लावून हे प्रवेशद्वार बंद केले आहे. त्यामुळे विद्यार्थी, कर्मचारी आणि शिक्षकांना 2 किलोमीटरचा वळसा घालून महाविद्यालयात यावे लागत आहे. हा मार्ग असुरक्षित असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची दखल घेऊन प्रवेशद्वार पुन्हा सुरु करावे. हे महाविद्यालयीन संकुल भाडे तत्वावर चालविण्यात येत आहे. एमपीटी सोबत झालेल्या करारात प्रवेशद्वार बंद करण्याची कोणताही बाब नमूद नाही. असे असतानाही एमपीटी प्रशासनाने मनमानी कारभार करत हे प्रवेशद्वार बंद केले आहे.
- जे. के. जाधव, संचालक, जे. के. नॉलेज सेंटर

याबाबत मुंबई पोर्ट ट्रस्टचे मुख्य सुरक्षा अधिकारी सुनील देशमुख यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी संबंधित प्रकरणाबाबत कोणतीही माहिती अथवा स्पष्टीकरण देण्याचा अधिकार नसल्याचे सांगत जनसपंर्क अधिकऱ्यांशी संपर्क साधा, अशी प्रतिक्रिया दिली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा