Advertisement

माहीम समुद्र किनाऱ्याचे सुशोभिकरण, पर्यटनाला चालना देण्यासाठी केले 'हे' बदल

मुंबईतील माहिम समुद्र किनारा सुशोभिकरण प्रकल्प पूर्ण झाला आहे.

माहीम समुद्र किनाऱ्याचे सुशोभिकरण, पर्यटनाला चालना देण्यासाठी केले 'हे' बदल
SHARES

मुंबईतील माहिम समुद्र किनारा सुशोभिकरण प्रकल्प पूर्ण झाला आहे. महानगरपालिकेच्‍या जी/उत्‍तर विभागाच्‍या वतीनं माहीम समुद्र किनारी पर्यावरणपूरक असे सौंदर्यीकरण करण्‍यात आले आहे. जवळपास ४ कोटी रुपये खर्च करुन हे संपूर्ण सुशोभिकरण करण्यात आले आहे.

माहिम समुद्र किनाऱ्यावरील सुशोभिकरणास बाधित होत असलेल्य ५ झोपडीधारकांना पर्यायी जागा देण्यात आली. त्यानंतर सदर झोपड्या निष्कासित करण्यात आल्या. तसंच, समुद्र किनाऱ्यालगतचा संपूर्ण कचरा तसंच नको असलेले दगड इत्यादी हटवण्यात आले. संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यात आली.

पाण्यामुळे किनाऱ्याची बरीच धूप झाली होती. निर्माण झालेली खोली भरुन काढण्यासाठी आणि भविष्यात धूप होऊ नये, यासाठी संपूर्ण माहीम समुद्र किनाऱ्यावर तब्बल ५ फूट उंचीपर्यंत वाळू पसरवण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, मुंबई सागरी किनारा रस्ता (कोस्टल रोड) प्रकल्पाच्या कामातून उपलब्ध होणारी वाळू आणल्यानं त्यासाठी महानगरपालिकेवर वेगळा आर्थिक भार पडलेला नाही. यासोबत, समुद्र किनारा संरक्षक भिंतीची डागडुजी करण्यात आली असून या भिंतीवर माहीम परिसरासह मुंबईची सांस्कृतिक वैशिष्ट्ये दर्शविणारी ललित चित्रे रेखाटण्यात आली आहेत.

समुद्र किनाऱ्याच्या सौंदर्यात भर म्हणून, तळहातामध्ये झाड जपल्याचं सुंदर असं नैसर्गिक शिल्पदेखील साकारण्यात आलं आहे. पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन सुरक्षित हातांमध्ये असल्याचा संदेश यातून देण्यात आला आहे.

किनाऱ्यावर विविध झाडांची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये वादळी हवेचा वेग कमी करण्याची क्षमता असणारे सुरू या झाडाच्या २०० रोपांची लागवड करण्यात आली आहे. सोबत, टिकोमाची ३५० आणि चाफ्याची २०० तर बांबूची ३०० रोपे लावण्यात आली आहेत. संपूर्ण सुशोभित किनाऱ्याभोवती बांबूचे कुंपण लावण्यात आले आहे. समुद्र किनाऱ्यावर येणाऱ्या नागरिकांना व्यायाम करण्यासाठी लावण्यात आलेले व्यायामाचे साहित्य आणि उपकरणं इत्यादी लाकडापासून बनवलेले आहे.

या समुद्र किनाऱ्यावर दगडाची पायवाट बनवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना किनाऱ्यावर सुलभतेनं फिरता येईल. तसंच, माहीम किनारा परिसर न्याहाळता यावा, म्हणून सुमारे ३० मीटर उंचीचा निरीक्षण मनोरा (Viewing Tower) उभारण्यात आला आहे. या मनोऱ्यावरुन वांद्रे-वरळी सागरी सेतूसह अरबी समुद्राचे मनोहारी दृश्य पाहता येते.



हेही वाचा

घाटकोपर-मानखुर्द उड्डाणपूल बंद, १ महिन्यापूर्वीच झालं होतं उद्घाटन

राज्यातील शाळांचा चेहरामोहरा बदलणार! आदर्श शाळांसाठी ४९४ कोटी मंजूर

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा