Advertisement

मुंबईत CNG पुन्हा महाग!

30 मेपासून MGL कडून दरवाढ

मुंबईत CNG पुन्हा महाग!
SHARES

महानगर गॅसने (Mahanagar Gas Limited) मुंबई आणि आसपासच्या परिसरातील CNG आणि PNG दरांमध्ये वाढ केली आहे. 29-30 मेच्या मध्यरात्रीपासून नवीन दर लागू झाले आहेत.

नवीन दरांनुसार आता CNG साठी प्रति किलो 86 रुपये मोजावे लागणार आहेत. घरगुती पाइप नॅचरल गॅस (PNG) दर प्रति SCM 52 रुपये झाला आहे. CNG दरात प्रति किलो 2 रुपयांची तर PNG दरात 50 पैशांची वाढ करण्यात आली आहे.

एमजीएलने दिलेल्या माहितीनुसार, देशांतर्गत नैसर्गिक वायूचा कमी पुरवठा, महागड्या गॅस स्रोतांवरील वाढती अवलंबित्व आणि रुपयाच्या घसरणीमुळे गॅस खरेदी खर्च वाढला आहे. त्यामुळे दरवाढ अपरिहार्य ठरल्याचे कंपनीने स्पष्ट केले.

विशेष म्हणजे, गेल्या दोन आठवड्यांत CNG दरवाढीची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 13 मे रोजीही प्रति किलो 2 रुपयांची वाढ करण्यात आली होती. सलग दरवाढीमुळे रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर आर्थिक ताण वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या वाढीनंतर रिक्षा-टॅक्सी संघटनांकडून भाडेवाढीची मागणी पुन्हा जोर धरू शकते. मागील दरवाढीनंतर संघटनांनी प्रति किलोमीटर 1 रुपयांची भाडेवाढ मंजूर करण्याची मागणी केली होती. इंधन आणि देखभाल खर्च वाढल्यामुळे उत्पन्नावर परिणाम होत असल्याचे चालक संघटनांचे म्हणणे आहे.

तथापि, एमजीएलने CNG अजूनही पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत किफायतशीर इंधन असल्याचा दावा केला आहे. कंपनीच्या मते, सध्याच्या दरांनुसार CNG वापरल्यास पेट्रोलच्या तुलनेत सुमारे 45 टक्के आणि डिझेलच्या तुलनेत सुमारे 12 टक्के बचत होते.

या नव्या दरवाढीचा परिणाम मुंबई महानगर प्रदेशातील लाखो वाहनचालक, प्रवासी आणि घरगुती ग्राहकांवर होणार आहे.



हेही वाचा

दादर पश्चिम-दादर पूर्वेला जोडणारा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा