मुंबईच्या नगरसेवकांना स्वत:साठी हवी राज्यभरात टोलमाफी

  Mumbai
  मुंबईच्या नगरसेवकांना स्वत:साठी हवी राज्यभरात टोलमाफी
  मुंबई  -  

  वरळी सी-लिंकवर टोलमाफी दिल्यानंतर आता मुंबईच्या नगरसेवकांना राज्यातील सर्वच टोलवरून विनामूल्य प्रवास हवा आहे. खासदार आणि आमदार यांना ज्याप्रमाणे सर्व टोल नाक्यांवर विनामूल्य प्रवासाची मुभा असते. त्याचप्रमाणे नगरसेवकांनाही राज्यातील सर्वच टोल नाक्यांवर टोलमाफी देण्यात यावी, अशा मागणीचा ठराव महापालिका सभागृहात करण्यात आला आहे.

  मुंबईतील अनेक नगरसेवकांना अनेक उपक्रमांना भेटी देण्यासाठी तसेच त्यांची पाहणी करण्यासाठी बऱ्याचवेळा शहराबाहेर जावे लागते. अशावेळी मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंक वगळता मुंबईबाहेरील सर्व टोलनाक्यांवर टोल भरावा लागतो. याउलट खासदार व आमदार यांना राज्यातील सर्व टोलनाक्यांवर विनामूल्य प्रवास करण्याची सवलत देण्यात येते. त्यामुळे या खासदार व आमदारांना देण्यात येणाऱ्या सवलतीच्या धर्तीवर मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना राज्यातील सर्व टोलनाक्यांवरून विनामूल्य प्रवास करण्याची सवलत देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना नगरसेवक तुकाराम पाटील यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. त्यानुसार ही सूचना मंजूर करत महापालिका सभागृहात ठराव करून राज्य सरकारकडे पुढील अभिप्रायसाठी पाठवण्यात आला आहे.

  मुंबई महापालिका ही आशिया खंडातील श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते. तिचा अर्थसंकल्प हा देशातील काही राज्यांच्या अर्थसंकल्पाएवढा मोठा आहे. मुंबईमध्ये अनेक महत्वाचे प्रकल्प राबवले जात असून शहरातील सुमारे सव्वाकोटी जनतेला अत्यावश्यक नागरी सुविधा पुरवण्यासाठी महापालिकेचे नगरसेवक सातत्याने कार्यरत असतात. यासाठी नगरसेवकांना मुंबईबाहेर विविध राजकीय व सामाजिक मेळाव्यांना उपस्थित राहावे लागते. तसेच महाराष्ट्र राज्यातील प्रमुख शहरांमध्येही राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांनाही भेटी देण्यास जावे लागते. त्यामुळे राज्यातील सर्व टोल नाक्यांवर नगरसेवकांना टोलमाफी मुंबईच्या नगरसेवकांना दिली जावी, अशी भूमिका तुकाराम पाटील यांनी मांडली.

  विमानतळावरील टोल टॅक्स रद्द करण्याची शिवसेनेची मागणी -
  छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ येथे सर्व प्रकारच्या वाहनांकडून आकारण्यात येणाऱ्या 130 रुपयांच्या टोलला शिवसेनेने तीव्र विरोध केला आहे. हा टोल बेकायदेशीरपणे वसूल केला जात असून तो त्वरीत बंद करण्यात यावा, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करावे लागेल, असा इशारा शिवसेना विभागप्रमुख आमदार अनिल परब यांनी जी. व्ही. के कंपनीला दिला आहे.

  विमानतळावर सर्व प्रकारच्या वाहनांकडून 130 रुपये टोल टॅक्स बेकायदेशीर वसूल केला जात आहे. शिवाय करारनाम्याप्रमाणे जी. व्ही. के. कंपनी वाहन शुल्कसुद्धा घेते. याचा त्रास नागरिकांना होत आहे. विमानतळावर सर्वच वाहने आतमध्ये जाऊन थांबत नाहीत. त्यामुळे त्यांना 130 रुपयांचा फुकटचा भुर्दड भरावा लागत आहे, असे अनिल परब यांनी कंपनीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.