
माझगाव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ही मिरवणूक काढण्यात आली होती. एल्फिन्स्टन येथील गणेशमूर्ती कार्यशाळेतून मूर्ती आणल्यानंतर जल्लोषात मिरवणूक सुरू होती. मात्र, मंडपाजवळ पोहोचताच जवळच्या इमारतीतून अंडी फेकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.
या प्रकारानंतर गणेशभक्त आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरली. मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर जमा झाले आणि संबंधित व्यक्तीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.
शेकडो गणेशभक्तांनी घटनास्थळी एकत्र येत संशयित व्यक्तीला तातडीने अटक करण्याची मागणी केली. काही नागरिकांनी घटनास्थळी आरती करत घोषणाबाजीही केली.
काही तास आंदोलन सुरू राहिलं. आरोपीची ओळख पटवून अटक होत नाही, तोपर्यंत घटनास्थळावरून हटणार नाही, अशी भूमिका नागरिकांनी घेतली.
त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी हस्तक्षेप करत नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं. तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 24 तासांत कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला आणि नागरिकांनी आंदोलन मागे घेतलं. मात्र, परिसरातील तणाव कायम असल्याचं सांगण्यात येत आहे.
अखिल सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष हितेश जाधव यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला. गणेशमूर्ती मंडपात आणली जात असताना अंडी फेकण्यात आल्याचा आरोप करत, कठोर आणि अजामीनपात्र कलमांखाली गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
या प्रकरणात सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनीही हस्तक्षेप केल्याचं सांगण्यात आलं असून, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे.
पोलिसांनी या प्रकरणी कलम 299 आणि 160 अंतर्गत गुन्हा दाखल केल्याचं सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून माझगाव परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. अंडी नेमकी कुठून आणि कोणी फेकली, याचा तपास पोलिसांकडून सुरू असून संबंधित व्यक्तीची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
हेही वाचा
