
एस्कलेटरचं Emergency Stop बटन दाबल्यानंतर सध्या ते पुन्हा सुरू करण्यासाठी जवळपास 25 मिनिटे लागतात. मात्र भारतीय रेल्वे आता ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सच्या मान्यताप्राप्त तांत्रिक मानकांवर आधारित नवीन यंत्रणा लागू करत आहे. त्यामुळे एस्कलेटर पुन्हा सुरू होण्याचा वेळ सुमारे 2 मिनिटांपर्यंत कमी होणार आहे.
मुंबईतील उपनगरीय रेल्वे स्थानकांवर दररोज हजारो प्रवासी एस्कलेटरचा वापर करतात. त्यामुळे वारंवार होणाऱ्या बिघाडामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते. नवीन यंत्रणेमुळे हा डाउनटाइम मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
रेल्वे बोर्डाने एस्कलेटरच्या देखभालीसाठी नवीन आणि कडक नियम लागू केले आहेत.
नवीन एस्कलेटर बसवणाऱ्या उत्पादक कंपन्यांना वॉरंटीचा कालावधी संपल्यानंतरही किमान 15 वर्षे सर्वसमावेशक देखभाल सेवा द्यावी लागणार आहे.
ही नवीन मार्गदर्शक तत्त्वे RDSO म्हणजेच Research Designs and Standards Organisation ने 16 जानेवारीला जारी केलेल्या अद्ययावत तांत्रिक मानकांनंतर लागू करण्यात आली आहेत. रेल्वे बोर्डाने 13 ऑगस्ट रोजी यासंदर्भातील निर्देश जारी केले.
यानुसार एस्कलेटरची तपासणी RDSOच्या निर्धारित चेकलिस्टनुसार करावी लागणार असून, तपासणीला रेल्वे अधिकारी आणि संबंधित उत्पादक कंपनीच्या प्रतिनिधीची संयुक्त मंजुरी आवश्यक असेल.
ज्या जुन्या एस्कलेटरची देखभाल संबंधित उत्पादक कंपन्या आता करत नाहीत, त्यांच्यासाठीही रेल्वेने नियम केले आहेत.
अशा एस्कलेटरची एकदाच दुरुस्ती करण्याची परवानगी रेल्वेला देण्यात आली आहे. दुरुस्तीनंतर संबंधित उत्पादक कंपनीला किमान सात वर्षे सर्वसमावेशक देखभाल करावी लागणार आहे.
तसंच, गर्दीची आणि संवेदनशील स्थानकं लक्षात घेऊन Annual Maintenance Contractमध्ये गरज पडल्यास अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्याची तरतूद असणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
एस्कलेटरमध्ये बिघाड झाल्यानंतर सुटे भाग उपलब्ध नसल्यामुळे दुरुस्तीला विलंब होऊ नये, यासाठी कंत्राटदारांना आवश्यक Spare Partsचा साठा ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, Western Railwayने एस्कलेटरच्या देखभालीवर नजर ठेवण्यासाठी स्वतंत्र वेबपेज तयार केलं आहे. यात देखभालीची कामं आणि अनिवार्य तपासण्यांचा मागोवा घेता येणार आहे.
आता भारतीय रेल्वे हे मॉनिटरिंग सिस्टम देशभरातील रेल्वे नेटवर्कवर विस्तारण्याच्या तयारीत आहे.
म्हणजेच, मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर एस्कलेटर बंद पडल्यास प्रवाशांना आता तब्बल 25 मिनिटे वाट पाहावी लागू नये, यासाठी रेल्वेकडून तांत्रिक आणि देखभालीच्या पातळीवर मोठे बदल केले जात आहेत.
हेही वाचा
