Advertisement

मुंबई अग्निशमनच्या ताफ्यात 22 क्विक रिस्पॉन्स व्हेइकल

एखादी दुर्घटना घडल्यास या वाहनांमुळे घटनास्थळी तत्काळ पोहोचून मदत मिळणार आहे.

मुंबई अग्निशमनच्या ताफ्यात 22 क्विक रिस्पॉन्स व्हेइकल
SHARES

अग्निशमन दलाच्या ताफ्यात फायर ड्रोन, फायर स्प्रे यांसारख्या यंत्रणा उपलब्ध असलेली २२ जलद प्रतिसाद वाहने (क्विक रिस्पॉन्स व्हेइकल) ताफ्यात दाखल झाली आहेत. ही वाहने मुंबई पालिकेच्या २४ पैकी २२ वॉर्डांमधील केंद्रात लवकरच ठेवली जाणार आहेत. एखादी दुर्घटना घडल्यास या वाहनांमुळे घटनास्थळी तत्काळ पोहोचून मदत मिळणार आहे.

अग्निशमन दलाच्या ताफ्यात सध्या २४ वॉर्डांमध्ये १७ जलद प्रतिसाद वाहने आहेत. आगीच्या घटनांबरोबर बचावकार्य, घर किंवा अन्य दुर्घटनांची संख्या पाहता जलद प्रतिसाद वाहनांची संख्या कमीच आहे. त्यामुळे अनेकदा घटनास्थळी पोहोचण्यास विलंब होतो. त्यामुळे अग्निशमन दलाने आणखी २२ जलद प्रतिसाद वाहने घेण्याचा निर्णय घेतला होता.

निविदा प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ही वाहने ताफ्यात दाखल झाली आहेत. २४ वॉर्डांपैकी २२ वॉर्डांमधील अग्निशमन केंद्रात ही जलद प्रतिसाद वाहने ठेवण्यात येणार आहेत. मुंबई पालिकेच्या डी आणि ई वॉर्डमध्ये बाजूबाजूला अग्निशमन केंद्र असल्याने या केंद्रात जलद प्रतिसाद वाहने न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

नवीन जलद प्रतिसाद वाहनांवर कंत्राटी जवान असतील. ज्या कंपनीकडून ही वाहने घेण्यात आली आहेत, त्याच कंपनीवर या वाहनांची पाच वर्षांसाठी देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी असणार आहे. तसेच कंपनीकडूनच पाच वर्षांसाठी जलद प्रतिसाद वाहनांवर कंत्राटी कर्मचारी तैनात केले जाणार आहेत.

एक चालक आणि दोन जवान यावर असतील आणि त्यांचे प्रशिक्षण महाराष्ट्र अग्निशमन सेवेतून पूर्ण झालेले असेल. या वाहनांमुळे अग्निशमन दलाच्या जवानांना घटनास्थळी चिंचोळ्या मार्गाने जाणे आणि अवघड ठिकाणी पाहोचणे सोपे होणार आहे.



हेही वाचा

बायोगॅस प्लांट उभारण्यासाठी महानगर गॅस लिमिटेडसोबत पालिकेने सामंजस्य करार

ठाणे : वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर अखेर कोलशेत खाडी उद्यान सर्वांसाठी खुले

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा