धोक्याची सूचना! पावसाळ्यात वाढू शकतो कोरोना, कारण सांगताहेत खुद्द सरकारी अधिकारी

पावसाळ्यात मुंबईत कोरोनाव्हायरसच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ शकते, अशी माहिती राज्य रोग देखरेख अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी मुंबई लाइव्हला दिली.

धोक्याची सूचना! पावसाळ्यात वाढू शकतो कोरोना, कारण सांगताहेत खुद्द सरकारी अधिकारी
SHARES

कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सरकारनं लॉकडाऊन लागू केलं. पण तरीही कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ पाहायला मिळत आहे. येत्या काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला आहे. अशात कोरोनाचे वाढते रुग्ण डोकेदुखी ठरू शकतात. यासंदर्भात आम्ही राज्य रोग देखरेख अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांच्याशी बातचित केली.

पावसाळ्यात मुंबईत कोरोनाव्हायरसच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ शकते, अशी माहिती राज्य रोग देखरेख अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी मुंबई लाइव्हला दिली. कोरोनाव्हायरसची लक्षणं इन्फ्लुएन्झा व्हायरसशी मिळती जुळती आहेत. पावसाळ्यात इन्फ्लूएन्झाचे संक्रमण वाढते. त्यामुळे कोरोनाव्हायरसे रुग्ण वाढू शकतात.

महाराष्ट्रातील महामारी विज्ञान विभागाचे प्रमुख असलेले डॉ. आवटे यांनी माहिती दिली की, पावसाळ्याच्या हंगामात आर्द्रता आणि पावसाचे प्रमाण पाहता कोरोनाव्हायरस या बदलत्या हवामानात कसा तग धरेल हे माहित नाही.

“आम्हाला माहीत नाही की कोरोनाव्हायरस बदलत्या हवामानात कसा वाढेल. विशेषत: मुंबईतल्या आर्द्र वातावरणात. इन्फ्लूएन्झा व्हायरस आणि कोरोनाव्हायरसमध्ये काही प्रमाणात साम्य आहे.  पावसाळ्यात इन्फ्लूएंझाचे संक्रमण वाढते. त्यामुळे कोरोनाव्हायरसचे संक्रमण वाढू शकते. पण हा फक्त आम्ही वर्तवलेला अंदाज आहे. आम्ही निश्चितपणे काहीही सांगू शकत नाही," असं डॉ प्रदीप आवटे म्हणाले.

COVID 19 वरील लॉकडाऊनच्या प्रभावावर बोलताना डॉ. आवटे यांनी सांगितलं की, लॉकडाऊनमुळे कोरोनव्हायरस पसरण्याची गती कमी झाली आहे. पण तरीही रुग्णांची सख्या दुप्पट झाली आहे.

डॉ. प्रदीप आवटे पुढे म्हणाले की, मुंबई, ठाणे आणि पुण्यासह महाराष्ट्राच्या नागरी पट्ट्यात जवळपास ८५-९० टक्के कोरोनाव्हायरसनं बाधित रुग्ण आहेत. लोकसंख्येची घनता अधिक असल्यामुळे कोरोनाव्हायरसच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे.

शहरी भागातील वाढत्या रुग्णांविषयी बोलायचं झालं तर, लोकसंख्येची घनता बघितली तर मुंबईत प्रति चौरस किलोमीटर २० हजार रहिवासी राहतात. तर ठाण्यात प्रति चौरस ११ हजार रहिवासी आणि पुण्यात ९ हजार रहिवासी राहतात, अशी माहिती अधिकाऱ्यानं दिली.   

डॉ.आवटे म्हणाले की, झोपडपट्टी परिसरात लॉकडाऊनचा काहीच परिणाम झाला नाही. झोपडपट्ट्यांमध्ये लोकसंख्येची घनता जास्त आहे. शहरी भागातील ४० ते ५० टक्के लोक झोपडपट्ट्यांमध्येच व्यास्तव्यास आहेत. त्यामुळे त्या परिसरात लॉकडाउनचे काटेकोरपणे पालन करणं कठिण आहे. जिथे १०० ते १८० चौ.फिट खोलीत ८-१० लोक राहतात. ‘घरी राहा आणि सुरक्षित रहा’ हे ब्रीद वाक्य ज्यांची घरे मोठी आहेत अशा लोकांसाठी आहे.

“स्वाभाविकच, झोपडपट्ट्यांमधील घनतेमुळे तिथली परिस्थिती हाताळणं कठिण आहे. झोपडपट्ट्यांमध्ये सोशल डिस्टनसिंग पाळणं देखील शक्य नाही, ”असं देखील ते म्हणाले.

२००९ मध्ये इन्फ्लुएंझा H1N1 च्या उद्रेकाला आळा घालणारे डॉ. प्रदीप आवटे म्हणाले की, कोरोनाव्हायरस या साथीच्या आजारांबद्दल लोकांमध्ये असलेली भीती दूर करणं आवश्यक आहे. या महामारीला अधिक योग्य दृष्टीकोनातून पाहिलं आणि हाताळलं गेलं पाहिजे.

“कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये वाढ होतेय. पण असं असलं तरी महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण देखील अधिक आहे. दररोज ९५-९६ लोकं बरे होत आहेत. रुग्णालयांमधील सर्व COVID 19 रूग्णांपैकी जवळपास ७० टक्के रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं आहेत किंवा चाचणी पॉझिटिव्ह आली पण रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणं नाहीत.
संबंधित विषय