Advertisement

महापौरांचा मराठीबाणा फुसका!


महापौरांचा मराठीबाणा फुसका!
SHARES

मुंबई - मुंबईच्या महापौरपदावर विराजमान झालेल्या प्राचार्य विश्वनाथ महाडेश्वर यांचा मराठीबाणा फुसका ठरला. मी बोलेन तर मराठीतूनच. तुम्ही कोणत्याही भाषेतून मला प्रश्न विचारा, पण मी मराठीतूनच उत्तर देईन, असे सांगत मराठीबाणा जागवणाऱ्या प्राचार्य महापौरांच्या तोंडातून अखेर इंग्रजी शब्दफेक झाली. इंग्रजीवृत्त वाहिन्यांच्या प्रतिनिधींना महापौरांनी इंग्रजी भाषेतून माहिती देत शिवसेनेच्या या मर्दमावळ्याचा मराठी बाणा फुसका असल्याचे दोनच दिवसांमध्ये दाखवून दिले.

मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी महापौरपदाचा भार स्वीकारल्यानंतर आपण मराठी भाषेतून बोलण्यास आणि कामकाज करण्यास प्राधान्य देणार असल्याचे जाहीर केले. मुंबई महापालिकेचे कामकाज हे 100 टक्के मराठी भाषेतून करण्याचे निर्देश प्रशासनाने दिलेले असून, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे महापालिकेत मराठी भाषेचा वापर कमी होत असतानाच नवनिर्वाचित महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी,मराठी भाषेचाच पुरस्कार करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यामुळे महापौरांनी मराठी भाषिक वृत्तवाहिन्यांच्या माध्यमांच्या प्रतिनिधींशी इंग्रजी व हिंदी भाषेतून बोलण्यास चक्क नकार दिला होता. महापौरांना, इंग्रजी भाषा अवगत असली तरीही मराठी भाषेवरील प्रेमापोटी त्यांनी इतर भाषेतून न बोलण्याचा आणि कामकाज न करण्याचा निर्धार करत इतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी मराठीतूनच बोलेन असे जाहीरपणे सांगण्यास सुरुवात केली. परंतु महापौरांचे हे मराठीप्रेम दोन दिवसही टिकले नाही. सोमवारी डॉक्टरांच्या संपाबाबत बोलावलेल्या पत्रकार परिषदेत महापौर महाडेश्वर यांनी चक्क इंग्रजी भाषेतून माहिती दिली. हे जेव्हा महापौरांना लक्षात आणून देण्यात आलं, तेव्हा आपण काय चूक केली, असा अविर्भाव त्यांनी दाखवला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा