SHARE

गोरेगाव - मुलुंड जोड रस्त्यांची कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्याचा दावा महापालिका प्रशासनाने केल्यानंतर या मार्गांच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आलं आहे. पूर्व द्रुतगती ऐरोली नाका ते खिंडीपाडा-मुलुंड आणि पश्चिम द्रुतगती मार्गावरील ऑबेरॉय मॉल ते फिल्मसिटी प्रवेशद्वार अशा दोन भागांचे रुंदीकरण व बांधकाम करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील सुरुवात आणि शेवटचा बॉटलनेकच काढून रस्त्यांचं तोंड आणि शेपूटच आधीच रुंद केलं जात आहे.


७६ कोटींचा खर्च

गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्यांची रुंदी ही ४५.७० मीटरपर्यंत अपेक्षित असून सध्या ऐरोली नाका ते नाहूर रेल्वे पूलपर्यंत ३० मीटर रुंदीचा आहे. त्यांची रुंदी वाढवून ४५.७० एवढी करण्यासाठी पूर्व द्रुतगती मार्ग ते तानसा पाईप लाईन खिंडीपाडा-मुलुंड इथपर्यंतचे काम हाती घेण्यात येणार आहे. या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिट व डांबरीकरणाने काम करण्यात येणार असून यासाठी ७६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. या कामांसाठी लँडमार्क कंपनीची निवड करण्यात आली आहे.


लँडमार्क कार्पोरेशनची निवड

 गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्यांवरील पश्चिम द्रुतगती मार्ग ऑबेरॉय मॉल ते फिल्मसिटी प्रवेशद्वार या भागाची रुंदीही ३० मीटर एवढी आहे. त्यामुळे या भागाच्या रस्त्यांचे रुंदीकरण व सिमेंट आणि डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात यणार आहे. यासाठीही ७३.४२ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. यासाठीही लँडमार्क कार्पोरेशन कंपनीची निवड झाली आहे.


भाजपाकडून विरोधाची शक्यता

सात महिन्यांपूर्वी लँडमार्क कंपनीने चुकीची माहिती दिल्यामुळे स्थायी समितीने त्यांचे दोन प्रस्ताव नामंजूर करत परत पाठवले होते. परंतु त्यानंतर भाजपाच्या विरोधानंतरही मालाडमधील रस्त्यांचा आणि महालक्ष्मी येथील महापालिका अधिकाऱ्यांच्या जिमखाना बांधणीचा प्रस्ताव शिवसेनेने मंजूर केले होते. त्यामुळे पुन्हा एकदा लँडमार्कचे दोन प्रस्ताव मंजुरीला आल्यामुळे भाजपाकडून याला तीव्र विरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.हेही वाचा -

बाबासाहेबांच्या स्मारकासाठी ११६ झाडांचा द्यावा लागणार बळी

विद्यापिठाचा असंवदेनशील कारभार : अपंग विद्यार्थ्याचे प्रॅक्टिकल पेपर घेण्यास नकार
संबंधित विषय
ताज्या बातम्या