Advertisement

महापौरांसह गटनेत्यांचा रशिया दौरा रद्द


महापौरांसह गटनेत्यांचा रशिया दौरा रद्द
SHARES

 महापौरांसह गटनेत्यांचा रशियातील सेंट पिटर्सबर्गचा दौरा अखेर रद्द करण्यात आला आहे. या परदेश दौऱ्यातून पहारेकरी असलेल्या भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी सर्वप्रथम माघार घेतली होती. त्यानंतर महापौरांसह सर्वच गटनेत्यांनी या दौऱ्यावर न जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पहारेकऱ्यांच्या भितीमुळे सत्ताधारी शिवसेनेला हा रशियाचा दौरा रद्द करावा लागला. परंतू मुंबईकर जनतेला वाऱ्यावर सोडून जाणं योग्य नसल्याने आम्ही हा दौरा रद्द करत असल्याचं महापौरांनी स्पष्ट केलंय.


सेंटर पिटर्सबर्ग गव्हर्नरांचे निमंत्रण 

रशियातील सेंट पिटर्सबर्ग येथे बहुमितित्वातील सुसंवाद या विषयावर चौथ्या आंतरराष्ट्रीय अवकाश विषयक विकास मंचामध्ये सहभागी होण्यासाठी सेंटर पिटर्सबर्गचे गव्हर्नर जॉर्जी पोल्टाव्हचेंनको यांनी मुंबईच्या महापौरांना निमंत्रण पाठवलं होतं. त्यानुसार या दौऱ्यावर जाण्यासाठी गटनेत्यांच्या सभेत याला मंजुरी देण्यात आली होती.  १७ ते २२ जुलै या कालावधीत या परिषदेचं आयोजन करण्यात आल आहे. याकरता महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, विरोधी पक्षनेते रवी राजा आणि भाजपाचे गटनेते मनोज कोटक तसेच प्रशासनाच्यावतीने डॉ. किशोर क्षीरसागर जाणार होते.


मनोज कोटक यांचा नकार

या दौऱ्यासाठी १३ जुलैला हे सर्व रशियासाठी रवाना होणार होते. त्यानंतर १४ जुलैला होणाऱ्या फुटबॉलच्या अंतिम सामना पाहण्यासाठी या सर्वांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यानंतर १७ ते २२ या कालावधीत परिषदेत सहभागी होणार होते. मात्र, ऐनवेळी भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी रशियाच्या या दौऱ्यावर जाण्यास नकार दिला. त्यामुळे कोटक यांच्या जागी सभागृहनेत्या विशाखा राऊत यांचं नाव निश्चित करण्यात आलं. 

पण कोटक यांनी माघार घेतल्यामुळे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनीही नकार दर्शवला. त्यामुळे अखेर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी हा दौराच रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे शुक्रवारी जनरल ऑफ दि रशियन फेडरेशनच्या कौन्सिलला कळवण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.


शिवसेनेला टिकेची भिती

भाजपाचे गटनेते मनोज कोटकांनी माघार घेतल्यामुळे ते आपल्यावर टिका करतील याची भीती शिवसेनेला आहे. मात्र, खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अनेकदा आमदार आणि नगरसेवकांच्या परदेश दौऱ्याला कात्री लावली होती. जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी परदेश दौरे करणे बाळासाहेबांना मान्य नसतानाही महापौरांना या निमंत्रणाचा स्वीकार केल्यामुळे शिवसेनेचा लगाम सुटला का असा प्रश्न उपस्थित होत होता.


महापौरांचा दुजोरा

मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी याला दुजोरा देत हा दौरा रद्द केल्याचं सांगितलं. सेंट पिटसबर्गच्या गव्हरर्नरने पाठवलेल्या निमंत्रणाचा आम्ही स्वीकार केला. परंतू सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. मुंबईची भौगोलिक स्थिती पाहता पावसाळ्यात आपत्कालीन स्थिती निर्माण होत असते. त्यामुळे मुंबईकर जनतेला वाऱ्यावर सोडून परदेशी जाणं हे काही आम्हाला पटणारं नाही. जनतेच्या सेवेसाठी शिवसेना सदैव कटीबध्द असून जनतेच्या हिताचा विचार करता पावसाळ्यात परदेश दौऱ्यावर जाणं योग्य समजत नाही,असं त्यांनी स्पष्ट केलं.



हेही वाचा -

महाव्यवस्थापक, पालिका आयुक्तांना हटवा, बेस्ट कर्मचाऱ्यांची मागणी

घाटकोपरमध्ये कल्पतरु ऑरा सोसायटीची संरक्षक भिंत खचली




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा