Advertisement

मुंबई पोलिसांचा 'त्या' प्रियकराला प्रेमळ सल्ला, ट्विट होतय व्हायरल; वाचा हसणं आवरणार नाही


मुंबई पोलिसांचा 'त्या' प्रियकराला प्रेमळ सल्ला, ट्विट होतय व्हायरल; वाचा हसणं आवरणार नाही
SHARES

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं मुंबईसह राज्यभरात कडक निर्बंध लागू केले आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी लॉकडाऊनच्या काळात शहरात प्रवास करायचा असेल तर कामाच्या स्वरूपानुसार गाड्यांवर विविध रंगांचे स्टिकर लावण्याचं आवाहन केलं आहे. मात्र, या स्टिकरच्या रंगांबाबत लोकांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळं अनेकजण पोलिसांना प्रश्न विचारत आहेत. त्यातील काही प्रश्न गंमतीशीर सुद्धा आहेत. ट्विटरच्या माध्यमातून असाच एक विचित्र प्रश्न विचारणाऱ्या मुंबईकरास पोलिसांनी तितकंच जबरदस्त उत्तर दिलं आहे.

पोलिसांनी ट्वीटरच्या माध्यमातून दिलेल्या या प्रश्नाचं उत्तर सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. अश्विन विनोद नावाच्या एका तरुणानं मुंबई पोलिसांना मैत्रिणीला भेटण्याबद्दल प्रश्न विचारला होता. 'मला मैत्रिणीला भेटायला जायचं आहे. त्यासाठी माझ्या वाहनावर कोणत्या रंगाचं स्टिकर लावावं लागेल,' अशी विचारणा त्यानं केली होती. मुंबई पोलिसांनी या प्रश्नाला तितकंच मजेदार उत्तर दिलं आहे.

'मैत्रिणीला भेटणं तुमच्यासाठी अत्यावश्यक आहे हे आम्ही समजू शकतो. मात्र, दुर्दैवानं ही गोष्ट आमच्याकडील अत्यावश्यक सेवांच्या यादीत मोडत नाही,' असं पोलिसांच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. इतकंच नव्हे, करोनाच्या सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी संबंधित तरुणाला महत्त्वाचा संदेशही दिला आहे. 'अंतर राखल्यानं प्रेम वाढतं आणि सध्याच्या काळात तुमच्या आरोग्यासाठीही ते चांगलं आहे. हा केवळ एक टप्पा आहे. आपण संपूर्ण आयुष्य एकत्र घालवावं ही सदिच्छा,' असंही पोलिसांनी ट्वीटमध्ये पुढं म्हटलं आहे.

मुंबई पोलिसांच्या या ट्वीटची सोशल मीडियात जोरदार चर्चा आहे. तणावाच्या आजच्या परिस्थिती पोलिसांनी दिलेल्या या सकारात्मक प्रतिसादाचं अनेक मुंबईकरांनी कौतुक केलं आहे. तसंच, आघाडीवर राहून काम करणाऱ्या पोलिसांचे आभार मानले आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा