Advertisement

मुंबई, ठाण्यातील काही भागांमध्ये रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा खंडित; अनेक सुविधांना मोठा फटका

महापारेषणच्या पडघा उपकेंद्रातील उच्चदाब वीज वाहिनीतील बिघाडामुळं वीजपुरवठा खंडित झाला.

मुंबई, ठाण्यातील काही भागांमध्ये रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा खंडित; अनेक सुविधांना मोठा फटका
SHARES

सोमवारी मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि रायगडमधील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला. महापारेषणच्या पडघा उपकेंद्रातील उच्चदाब वीज वाहिनीतील बिघाडामुळं वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळं रेल्वे, रस्ते वाहतुकीसह पाणीपुरवठा, इंटरनेट यावर मोठा फटका बसला. दरम्यान, त्यानंतर तातडीनं महापारेषणानं दुरुस्तीचे काम हाती घेतलं. 

संध्याकाळपर्यंत सुमारे ६०-७० टक्के भागांतच वीजपुरवठा सुरू होऊ शकला. यात प्रामुख्याने रेल्वे आणि रुग्णालयांचा वीजपुरवठा प्राधान्याने सुरू करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत मुंबई, ठाणे, नवी मुंबई आदी विविध ठिकाणी अनेक भागांत विजेअभावी लाखो लोकांचे हाल झाले. दुपारी १ च्या सुमारास हळूहळू वीजपुरवठा सुरळीत होण्यास सुरुवात झाली, पंरतु रात्री उशिरापर्यंत अनेक भागांत वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येत होता. मात्र मुलुंड, ठाण्यातील काही भागांमध्ये रात्रभर वीज नव्हती. मुलुंड, ठाण्यामागील अनेक भागांमध्ये १४ तासांपासून अधिक काळ वीज पुरवठा खंडित होता.

मुलुंड, ठाण्यातील काही भाग रात्रभर अंधारात राहण्यामागील मुख्य कारणासंदर्भात उर्जा मंत्री नितीन राऊत यांनीच ट्विटरवरुन रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास माहिती दिली. राऊत यांनी केलेल्या ट्विटमध्ये, 'टाटाचे ५०० मेगावॅटचे सिक्रोनायझेशन होऊ शकलेले नाही. मुलुंड, ठाणे, नवी मुंबईतील काही भागांमध्ये वीजपुरवठा सुरळीत झालेले नाही. मात्र रात्री दहापर्यंत तो होईल. सध्या मुंबईतील २१०० मेगावॅट गरज पूर्ण केली जात आहे', असं म्हटलं होतं.

त्यानंतर पुन्हा एकदा ट्विट करुन त्यांनी माहिती दिली. 'आमचे कर्मचारी मुलुंड, ठाणे, नवी मुंबई आणि मालाडमधील काही भागांमध्ये खंडित असणारा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहेत. टाटाकडून वीज निर्मीती सुरु झाली आहे. मी स्वत: या कामावर लक्ष ठेऊन आले. तासाभरामध्ये सर्वकाही सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे', असं राऊत यांनी म्हटलं आहे.



हेही वाचा -

One Nation One Card: बेस्टमध्ये 'वन नेशन, वन कार्ड'च्या उपक्रमाला सुरुवात

अमित ठाकरेंनी घेतली सरकारची बाजू! म्हणाले, पर्यावरणाचं नुकसान होण्यापेक्षा...


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा