Advertisement

२३१ मि.मी पावसात मुंबई तुंबली


२३१ मि.मी पावसात मुंबई तुंबली
SHARES

मुंबईत सोमवारी दिवसभरात शहर आणि उपनगरांमध्ये २३१ मि.मी पावसाची नोंद झाली. परंतु किरकोळ पावसातही मुंबईला सखल भागात लावलेल्या एकूण उपसा करणाऱ्या पंपांपैकी ७० टक्के पंप चालू करावे लागले आहे. तसंच विजय सिंघल, आयए. कुंदन आणि आबासाहेब जऱ्हाड या तिन्ही अतिरिक्त आयुक्त तसेच सहाय्यक आयुक्तांसह सुमारे ६३३ अधिकारी आणि ४६७० कर्मचारी या कामाकरता तैनात करावे लागले. सुरू केलेल्या पंपाची आकडेवारीच मुंबईत पाणी तुंबल्याची ग्वाही देत आहे.


सर्वाधिक पावसाची नोंद

कुलाबा वेधशाळेनुसार सोमवारी २४ जून रोजी सकाळी ८ ते २५ जूनच्या सकाळी ८ या कालावधीत सांताक्रूझ येथे २३१.४ मिमी तर कुलाबा येथे ९९ मिमी पावसाची नोंद झाल्याची आकडेवारी महापालिका अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यामध्ये बोरीवली भागात २३७ मिमी तर कांदिवलीमध्ये २२८ मि.मी, दहिसरमध्ये २१५ मि.मी एवढ्या सर्वाधिक पावसाची नोंद झाल्याची माहिती त्यांनी दिली.


मुंबई तुंबली कशी?

मुंबईतील पावसाळी पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढवण्यात आली असून ताशी ५० मिमी पाऊस पडला तरी मुंबईत पाणी भरणार नाही, अशी वल्गना महाालिकेकडून करण्यात येते. परंतु चौवीस तासात २३१ मिमी पाऊस पडल्यानंतर मुंबई तुंबलीच कशी? असा सवाल उपस्थित होत आहे.

मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी साचलं होतं. परंतु, त्याचा निचरा जलदगतीनं न झाल्यानं मुंबईकरांना याचा अधिक त्रास झाला नसल्याचा दावा महापालिकेनं केला आहे. मात्र मंगळवारीही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून काही भागांमध्येच तो मुसळधार पडला जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्याची माहितीही त्यांनी दिली.


२९५ पंप बसवले

पावसामुळे तुंबलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी महालिकेच्या २९५ पंप बसवण्यात आले आहे. त्यापैकी मुंबई शहर आणि उपनगरात १८३ ठिकाणी पंप सरू करण्यात आले होते. तसंच सात मुख्य पंपिंग स्टेशनमधील २२ पंप चालू करण्यात आले असल्याची माहिती विजय सिंघल यांनी दिली.


४ पंप डिझेल अभावी बंद

पश्चिम उपनगरातील वांद्रे येथील चमडावाडी नाल्यावरील ४ पंप डिझेल अभावी बंद असल्याने कंत्राटदार महाबुल इंफ्रा इंजिनियरींग प्रा.लि. कंपनीला 5 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या कंपनीला काळ्या यादीत का टाकण्यात येऊ नये, याबाबत २४ तासांची नोटीस सोमवारी पर्जन्यजल विभागाने बजावली. 

संबंधित कंत्राटदाराने या ४ पंपांसाठी २०० लिटरचा अतिरिक्त साठा ठेवणं बंधनकारक होतं. तसंच त्यांना लेखी आणि तोंडी बजावण्यात आलं होतं. तरीही गरज असताना रविवारी आणि सोमवारी डिझेल अभावी हे पंप सुरू होऊ शकलं नाही. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांच्या निर्देशानुसार विभागाने दंडात्मक कारवाई करताना नोटीस बजावली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा