Advertisement

मुंबई तुंबली आणि आयुक्तांनी तोंड लपवले!


मुंबई तुंबली आणि आयुक्तांनी तोंड लपवले!
SHARES

गौरीच्या आगमनाच्या दिवशीच वरुण राजाचा कोप झाला आणि या पावसाळ्यात कधी नव्हे तेवढा पाऊस कोसळला. पावसाने, मुंबईला झोडपून काढले नाही तर मुसळधार बरसात केली. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी तुंबून मुंबई जलमय झाली. मुंबईत यंदा नालेसफाईचे काम योग्यप्रकारे झाले असून पाणी तुंबण्याचा प्रश्नच नाही, असे सांगणाऱ्या महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना मंगळवारी डोक्यावर रुमाल टाकून तोंड लपवण्याची वेळ आली आहे.

नालेसफाईसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून काम केले जात असले तरी मुंबई पावसाळ्यात तुंबते, असे आरोप होत असले तरी यंदा नालेसफाईचे काम योग्यप्रकारे झाले आहे. त्यामुळे यंदा पाणी तुंबलेले पाहायला मिळणार नाही, असे आश्वासन खुद्द महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी अर्थसंकल्पावर आपले निवेदन मांडताना सभागृहाला दिले होते. परंतु, हे निवेदन करून आठ दिवस उलटत नाही, तोच मंगळवारी ठिकठिकाणी पाणी तुंबून मुंबई जलमय झाली.


मुंबईतील हिंदमाता, मिलन सब वे, खार सब वे, अंधेरी सब वे, मालाड सब वे, दहिसर सब वेसह चेंबूर आदी भागांमध्ये पाणी तुंबण्याचे प्रकार घडतच असतात. परंतु, मंगळवारी दादर टीटीसह काळा चौकी, चिंचपोकळी, माटुगा पूर्व, माटुंगा पश्चिम, माहीम, दादर,कुर्ला, शीव, घाटकोपर, वरळी, लोअर परळ, अंधेरी, जोगेश्वरी आदी भागांमध्ये मोठ्याप्रमाणात पाणी तुंबण्याचे प्रकार घडले. यासर्व भागांमध्ये आजवर पाणी तुंबण्याचे प्रकार घडले नव्हते.

मुंबईत 2015मध्ये तासाला 25 मि.मी पेक्षा अधिक पाऊस हा 15 वेळा पडला होता. परंतु त्यावेळीही पाणी तुंबले गेले नाही. मागील वर्षी 100 दिवस मुसळधार पाऊस पडला तरीही मुंबईत पाणी तुंबले नाही, असे दाखले महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले. त्यामुळे यावर्षीही तुंबलेले पाणी दिसणार नाही, असा विश्वास अजोय मेहता यांनी व्यक्त केला होता. परंतु, मंगळवारी वरुणराजाने खोटी आश्वासने देणाऱ्या अजोय मेहता यांना खोटे ठरवले. मुंबईत आजवर ज्या भागांमध्ये पाणी तुंबले नव्हते त्याच भागांमध्ये तुंबून प्रशासनाला वरुणराजाने खोटे ठरवले.


मुंबईत सहा ठिकाणी पंपिंग स्टेशन सुरू करण्यात आली आहे. तर यंदा पाण्याचा निचरा करण्यासाठी 310 पंप बसवण्यात आले आहेत. यासर्व पंपांपैकी 217 पंप सुरू करण्यात आले होते. तरीही सकाळी अकरावाजल्यापासून तुंबलेले पाणी संध्याकाळपर्यंत ओसरलेले नव्हते.

अंधेरी सब वे येथील पावसाचे पाणी ओसरले आहे. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, कुर्ला रेल्वे स्थानक आणि अंधेरी रेल्वे स्थानकाबाहेर पावसाचे पाणी साचलेले आहे, अशी माहिती उपायुक्त सुधीर नाईक यांनी संध्याकाळी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत दिली. वाहतुकीसाठी बीईएसटीच्या जादा बसेस जास्त संख्येने सोडण्यात आलेल्या आहेत. मुंबई शहर आणि उपनगरात दुपारी अकरा वाजल्यापासून पाच तासांमध्येच 11 ठिकाणी 100 मि. मी पेक्षा जास्त पाऊस पडला आहे. त्यापैकी एका ठिकाणी 177 मि. मी पेक्षा जास्त पाऊस पडला आहे. 4 ठिकाणी 150 मि. मी पेक्षा जास्त पाऊस पडला असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले.

संबंधित विषय