मुदत संपूनही मुंबईचे रस्ते खोदलेलेच

  CST
  मुदत संपूनही मुंबईचे रस्ते खोदलेलेच
  मुंबई  -  

  मुंबईतील रस्त्यांवर सेवा सुविधांच्या वाहिनी टाकण्यासाठी खोदलेले चर हे 19 मेपूर्वी बुजवण्यात यावेत, असे सक्त आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी देऊनही मुंबईतील खोदलेल्या चरी बुजवलेल्या नाहीत. मुंबईतील अनेक रस्त्यांवर विविध सेवा सुविधा पुरवणाऱ्या कंपन्यांकडून मुंबईचे रस्ते आणि पदपथ खोदून ठेवलेले आहेत. महापालिकेच्या नोंदीत आजपर्यंत साडेआठ किलोमीटर लांबीचे खोदलेले चर बुजवण्याचे काम शिल्लक असले, तरी प्रत्यक्षात यापेक्षा अधिक किलोमीटर लांबीचे रस्ते खोदून ठेवलेले आहेत.

  महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी झालेल्या मासिक आढावा बैठकीत रस्ते प्रमुख अभियंता संजय दराडे यांनी रस्त्यांवर खोदलेल्या चरींबाबत माहिती दिली. मागील वर्षी 1 ऑक्टोबर 2016 ते 31 मे 2017 पर्यंत 378.12 किलोमीटर लांबीचे चर खोदण्याची परवानगी विविध कंपन्या तसेच संस्थांना महापालिकेने दिली होती. कंपन्या, संस्थांचे काम झाल्यानंतर यापैकी 369.60 किलोमीटरचे चर बुजवण्यात आले. केवळ 8.60 किमी लांबीचे चर बुजवण्याचे काम शिल्लक अाहे. हे सर्व चर येत्या 3 दिवसांत पूर्ववत करण्याचे निर्देश यावेळी आयुक्तांनी दराडे यांना दिले. 

  विशेष म्हणजे खोदलेले चर बुजवून रस्ते पूर्ववत करण्याची मुदत 19 मेपर्यंत होती. परंतु 31 मे उलटून गेल्यानंतरही मुंबईच्या रस्त्यांवर खोदलेले चर कायम आहेत. आयुक्तांनी तीन दिवसांची मुदत दिली असली तरी प्रत्यक्षात हे चर शास्त्रोक्त पद्धतीने बुजवून पूर्ववत होत नाहीत. परिणामी नागरिकांना चालताना मोठा त्रास सहन करावा लागतो. लोअर परळमधील सीताराम जाधव मार्गावरील चर तर अक्षरश: केवळ वरच्यावर माती टाकून बुजवण्यात आले आहेत. 

  पावसाळ्यात 2500 गणवेशधारी कर्मचारी रस्त्यांवर-

  पावसाचे पाणी ज्या सखल भागात तुंबते, त्या भागाचा मागील इतिहास लक्षात घेऊन त्या सर्व ठिकाणांवर आणि विभागांत सुमारे 2500 महापालिकेचे कर्मचारी गणवेषात कर्तव्यावर उपस्थित राहतील, असे महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्याच्या सूचना सर्व उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांना देण्यात आल्या आहेत. पावसाळ्याच्या काळात मॅनहोल उघडे असणे, झाडे पडणे, भूस्खलन होणे, धोकादायक इमारती पडणे, यामुळे दुर्दैवी घटना घडू नये यासाठी विशेष काळजी घेण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.

  गझधरबंद पंपिंग स्टेशन 9 जूनपर्यंत होणार कार्यान्वित -
  गजदरबंध उदंचन केंद्र 9 जून 2017 पर्यंत कार्यान्वित करण्याचे आदेश आयुक्तांनी प्रमुख अभियंता (पर्जन्यजल वाहिन्या) यांना दिले आहेत. पश्चिम उपनगरातील महापालिकेच्या 'एच/पश्चिम' व 'के/पश्चिम' या विभागाच्या कार्यक्षेत्रात पावसाळ्यादरम्यान साचल्या जाणाऱ्या पाण्याचा त्वरीत निचरा व्हावा आणि संभाव्य पूर परिस्थितीच्या अनुषंगाने प्रभावी प्रतिबंधात्मक कार्यवाही व्हावी, यादृष्टीने 'गजदरबंध' पातमुखावर पर्जन्यजल उदंचन केंद्र (पंपिंग स्टेशन)बांधण्यात येत आहे. विलेपार्ले, सांताक्रूज आणि खार या परिसरांचा पश्चिम भाग तर वांद्रे (प.) व सांताक्रूज (प.) परिसरातील काही भाग आदी परिसरांमध्ये गजदरबंध उदंचन केंद्रामुळे पाणी तुंबण्याचे प्रमाण कमी होईल.

  विभागवार हमी कालावधीतील रस्त्यांच्या कंत्राटदारांसोबत बैठक -

  पावसाळ्यात रस्त्यांची काळजी घेण्यासाठी नेमलेल्या कंत्राटदारांची तसेच दोष दायित्व अर्थात हमी कालावधीतील रस्त्यांचे कंत्राटदारांची प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक) यांनी तातडीने बैठक घेण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. या कंत्राटदारांचा साधनसामुग्री, मनुष्यबळ आणि एकूण क्षमता याच्या उपलब्धतेबद्दल आढावा घेऊन त्यांना पावसाळ्यासाठी पूर्ण तयारीत राहण्यासाठी आदेश द्यावेत तसेच त्यांचे संपर्क क्रमांक संबंधित सहाय्यक आयुक्तांना देण्याच्याही सूचना आयुक्तांनी या बैठकीत दिल्या आहेत. सध्या मुंबईत मेट्रोची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. मेट्रोची कामे सुरू असल्याच्या ठिकाणी पाणी तुंबणार नाही याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देशही आयुक्तांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.