
मुंबई वाहतूक पोलिसांनी अवघ्या 20 मिनिटांत सुमारे 32 किलोमीटरचे अंतर पार करत डोनर हृदय सुरक्षितपणे दक्षिण मुंबईतील रुग्णालयात पोहोचवले. मुंबईतील आतापर्यंतचा सर्वात वेगवान ग्रीन कॉरिडॉर तयार केल्याचा दावा केला जातोय. जीव वाचवणाऱ्या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी हे हृदय Sir H. N. Reliance Foundation Hospital येथे नेण्यात आले.
डोनरचे हृदय नवी मुंबई विमानतळ (Navi Mumbai Airport) येथे आणण्यात आल्यानंतर तातडीने विशेष सिग्नल-फ्री मार्गाने रुग्णवाहिकेद्वारे दक्षिण मुंबईकडे रवाना करण्यात आले. या वेळी अटल सेतु (Atal Setu) चा वापर करण्यात आला. वाहतूक पोलिसांच्या माहितीनुसार, मुंबईतील अवयव वाहतुकीतील हा आतापर्यंतचा सर्वात जलद प्रवास ठरला आहे.
या संपूर्ण ऑपरेशनसाठी मुंबई ट्रॅफिक पोलिसांच्या विविध पथकांची मार्गावर नियुक्ती करण्यात आली होती. सिग्नल आधीच समन्वयित करण्यात आले होते. सीसीटीव्हीद्वारे रुग्णवाहिकेवर रिअल-टाइम नजर ठेवण्यात येत होती, तर पायलट वाहनांनी प्रमुख चौकांमधील वाहतूक काही सेकंद आधीच मोकळी केली.
अधिकाऱ्यांच्या मते, वांद्रे वरळी सी लिंक (Bandra-Worli Sea Link), कोस्टल रोड आणि अटल सेतूसारख्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांमुळे आपत्कालीन अवयव वाहतुकीचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि खराब रस्त्यांचा अडथळा टाळता येत आहे.
वाहतूक पोलिसांनी सांगितले की, ग्रीन कॉरिडॉर ही शहरातील सर्वात संवेदनशील आपत्कालीन सेवा मानली जाते. कारण हृदयासारखे अवयव शरीराच्या बाहेर अत्यंत कमी वेळ सुरक्षित राहू शकतात. अशा परिस्थितीत वाचवलेला प्रत्येक मिनिट प्रत्यारोपण यशस्वी होण्याची शक्यता वाढवतो.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, गेल्या काही महिन्यांत मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी मुंबई महानगर प्रदेशात विशेष ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून हृदय, फुफ्फुसे आणि यकृतासह 20 हून अधिक अवयवांच्या वाहतुकीत मदत केली आहे.
हेही वाचा
