SHARE

मुंबई महापालिका प्रशासनाने यंदा महापालिकेच्या शाळांमधील मुलांना जर्मनीचा फुटबॉल अभ्यासक्रम शिकवण्यासाठी ‘रोड टू जर्मनी’ हा कार्यक्रम राबवण्याचं जाहीर केलं. हे फुटबॉल प्रशिक्षण केवळ युवराजांच्या हट्टाखातर होत असून फुटबॉलसाठी जर्मनीचे स्वप्न दाखवणाऱ्या आणि शिक्षणाचा फुटबॉल करणाऱ्यांनी आपलं राष्ट्रीय खेळ असलेल्या कबड्डी, खोखो आणि मलखांब आदींचे प्रशिक्षण देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी आदित्य ठाकरेंचा समाचार घेतला.


मुलांची गळती सुरूच

मुंबई महापालिकेतील मुलांना टॅब देण्यात आलेत. पण त्यातील किती टॅब चालू स्थितीत आहे, किती बंद आहेत, याची माहिती विभागाकडे उपलब्ध नसल्याचे सांगत ही योजनाच अयशस्वी ठरल्याचे डॉ. खान म्हणाल्या. शाळांमधील मुलांच्या गळतीचे प्रमाण हे आठ टक्के असून यात कोणत्याही प्रकारची सुधारणा झालेली नाही. गळतीची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अशाचप्रकारे गळती लागत गेली तर पुढील पाच वर्षांत या मुलांची संख्या अडीच लाखांवर येईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. एका बाजूला भांडवली खर्च प्रत्येक वर्षी वाढत आहे, दुसरीकडे मात्र मुलांची गळती सुरुच आहे. त्यामुळे अर्थसंकल्पातील तरतुदींचा खर्च करण्यासाठी कोणाही एका अधिकाऱ्यावर जबाबदारी टाकली जावी, असं त्यांनी सांगितलं.


याचाही विचार करा

महापालिका शाळांमध्ये उत्तम दर्जाचे शिक्षण देण्यासाठी आधी विषय निहाय शिक्षकांची नियुक्ती होणे आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या प्रत्येक वर्गाला एकच शिक्षक आहे, आणि तो गैरहजर राहिल्यास मुलांचा कोणीही अभ्यास घेत नाही. मुंबई पब्लिक स्कूलची संख्या वाढवणे आवश्यक असल्याचं सांगत त्यांनी या शाळांमधील मुलांची संख्या मागील तीन वर्षांत वाढल्याची आकडेवारी दिली. शाळांचे खासगीकरण केलं जाणार आहे. पण त्या शाळांची देखभाल करण्याची जबाबदारी कुणाची असणार, मुलांकडून शुल्क घेणार का? करार किती वर्षांचा केला जाणार? आंतरराष्ट्रीय शाळा या तीन टप्प्यात चालवल्या जातात. ज्यामध्ये पहिली ते पाचवी,  दुसऱ्या टप्प्यात सहावी ते दहावी आणि तिसऱ्या टप्प्यात ११ आणि १२वी. अशाप्रकारे शिक्षणपद्धती चालवली जाते. मग आपल्या शाळेत जी मुले शिकतात त्यांचा अशाप्रकारे का विचार केला जावू शकत नाही, असा सवाल त्यांनी केला.
मुलांची बायोमेट्रीक हजेरी घेण्याचा विचार सुरू आहे. पण या बायोमेट्रीक मशीन एका उंचीवर लावल्या जातात, मग या मशीनचा वापर लहान मुलं कशी करतील? असाही सवाल त्यांनी केला. 

संबंधित विषय
ताज्या बातम्या