Advertisement

'एमएमआरडीए'च्या पुलाला सरकत्या जिन्याचा आधार


'एमएमआरडीए'च्या पुलाला सरकत्या जिन्याचा आधार
SHARES

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा(एमएमआरडीए)ने सांताक्रूझ - चेंबूर जोडरस्ता बांधल्यानंतर पादचाऱ्यांना हा वर्दळीचा रस्ता ओलांडता यावा या उद्देशाने कुर्ला पश्चिमेकडे पादचारी पूलही उभारला. परंतु या पुलाच्या पायऱ्यांची उंची अधिक असल्याने पादचारी या पुलाचा वापर करणे टाळतात. त्यामुळे पादचाऱ्यांच्या सोईसाठी महापालिकेने या पुलाला जोडून सरकते जिने बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

'एमएमआरडीए'ने बांधलेला सांताक्रूझ - चेंबूर जोडरस्ता 45.70 मीटर रुंद असल्याने, तसेच या रस्त्यावर वाहतुकीचे प्रमाण प्रचंड असल्याने पादचाऱ्यांना हा रस्ता ओलांडताना अडचणी यायच्या. त्यामुळे 'एमएमआरडीए'ने कुर्ला पश्चिमेकडील बुद्ध कॉलनी येथे एक पादचारी पूल बांधून तो दोन वर्षांपूर्वी महापालिकेकडे हस्तांतरित केला. परंतु या पुलाची उंची अधिक असल्याने या पुलाचा वापर पादचाऱ्यांकडून होत नसल्याचे महापालिकेच्या निर्दशनास आले आहे. त्यामुळे या पुलाला जोडून 'स्वयंचलित जिने' बसवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पुलावर 'स्वयंचलित जिने' बसवण्यासाठी 2 कोटी 62 लाख रुपयांचा खर्च होणार आहे. या कामासाठी कंत्राटदाराची नेमणूक झाली असून लवकरच या कामाला सुरुवात होईल.

या पादचारी पुलाची उंची जास्त आहे. तसेच पूल नागमोडी वळणाचा असल्याने पादचारी या पुलाचा वापर करत नाहीत. त्याऐवजी दुभाजक ओलांडून रस्ता ओलांडने पसंत करतात. पादचाऱ्यांना अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेने पुलाच्या दोन्ही बाजूला 'स्वयंचलित जिने' बसविण्याचा निर्णय घेतला आहे.
- शितलाप्रसाद कोरी, प्रमुख अभियंता, पूल विभाग

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा