Advertisement

रात्रशाळा विद्यार्थी मंत्रालयावर धडकले


रात्रशाळा विद्यार्थी मंत्रालयावर धडकले
SHARES

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या फतव्याने गुरुवारी एका फटक्यात मुंबईतील अनेक रात्रशाळा बंद पडल्या आहेत, असा आरोप छात्रभारतीच्या विद्यार्थी संघटनेने केला आहे. या निर्णयाचा निषेध नोंदवण्यासाठी छात्रभारती विद्यार्थी संघटनेने रात्र शाळा वाचवा, आमचे शिक्षण वाचवा आणि आमचे शिक्षक आम्हाला परत द्या ! अशी मागणी करत गुरुवारी रात्री मंत्रालयाच्या गेटवर रात्रशाळा भरवली. पण, याला विरोध करत पोलिसांनी शारदा या रात्रशाळेतून दहावीमध्ये 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या अनिकेत उडदे आणि दिवसाला घरोघरी सिलेंडर पुरवत याच रात्र शाळेतून बारावीचे शिक्षण घेणाऱ्या नाना शेंबडे याच्यासह छात्रभारतीच्या 30 कार्यकर्त्यांना मंत्रालयाच्या गेटवरच अटक केली.

अनिकेतचा सत्कार करण्यासाठी आणि सरकारचा निषेध करण्यासाठी हे रात्रशाळेचे विद्यार्थी मंत्रालयाच्या गेटवर धडकले होते. रात्रशाळा विद्यार्थ्यांच्या सत्काराला येण्याऐवजी शिक्षणमंत्री रात्रशाळा बंद करत आहेत, याचा आम्ही निषेध करतो, असे छात्रभारतीचा राज्य उपाध्यक्ष सागर भालेराव यांनी सांगितले.

गुरुवारी रात्री 7 वाजता पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असतानाही या अभिनव आंदोलनाची धडक मंत्रालयाच्या गेटवर झाली. तेव्हा पोलिसांची धावपळ उडाली. त्या धावपळीत अनिकेतचा सत्कार आणि शिक्षण मंत्र्यांच्या विरोधात घोषणा देत असलेल्या मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी रोहित ढाले, सचिन काकड, लोकेश लाटे, प्रणय साळवी, विशाल कदम, निलेश झेंडे यांच्यासह अनेक विद्यार्थी उपस्थित होते.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा