Advertisement

‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत मालवाहतुकीच्या नियमांत बदल

राज्यामध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी १२ मे, २०२१ रोजी लागू करण्यात आलेल्या ‘ब्रेक दि चेन’ आदेशातील परराज्यातून महाराष्ट्रात होणाऱ्या मालवाहतुकीच्या अनुषंगाने मुद्दा क्र. ३ मध्ये सुधारणेबाबतचे आदेश राज्य शासनाने निर्गमित केले आहेत.

‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत मालवाहतुकीच्या नियमांत बदल
SHARES

राज्यामध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी १२ मे, २०२१ रोजी लागू करण्यात आलेल्या ‘ब्रेक दि चेन’ आदेशातील परराज्यातून महाराष्ट्रात होणाऱ्या मालवाहतुकीच्या अनुषंगाने मुद्दा क्र. ३ मध्ये सुधारणेबाबतचे आदेश राज्य शासनाने निर्गमित केले आहेत. हे आदेश १२ मे रोजीच्या आदेशाप्रमाणे १ जून २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत लागू राहतील. नव्या नियमानुसार ४८ तास आधी आरटीपीसीआर चाचणी अहवालाचे आदेश रद्द करण्यात आले आहेत.

राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या आधीच्या परिपत्रकानुसार राज्याबाहेरुन महाराष्ट्रात (maharashtra) येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीआसीरआर चाचणी बंधनकारक करण्यात आली होती. ही चाचणी महाराष्ट्रात दाखल होण्याच्या ४८ तास आधी केलेली असावी तसंच ती निगेटिव्ह असावी असं आदेशात नमूद करण्यात आलं होतं. त्याचसोबत माल वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये चालक आणि क्लिनर या दोघांव्यतीरिक्त अन्य कुणालाही मुभा नसेल, असं नमूद करण्यात आलं होतं.

हेही वाचा- मुंबईत 'म्युकरमायकोसिस'चे १११ रुग्ण आढळले

मात्र, हे मालवाहतूकदार अत्यावश्यक साहित्य घेऊन अनेक राज्यांतून प्रवास करतात. अनेक वाहनं प्राणवायूचे सिलिंडर, औषधे, आरोग्य क्षेत्रातील उत्पादने, अन्नधान्य, कारखान्यांसाठीचा कच्चा माल, आयात-निर्यात मालाची वाहतूक करणारी असतात. महाराष्ट्रात प्रवेश करण्यासाठी त्यांना सीमेजवळील गावांमध्ये आरटीपीसीआर चाचणी केंद्र शोधत फिरावे लागू शकतं. आरटीपीसीआर चाचणी अहवाल मिळण्यास २ ते ३ दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे मालवाहतूकदारांना चाचणी अहवाल येईपर्यंत २ दिवस मालाची गाडी रस्त्याकडेला उभी करण्याशिवाय गत्यंतर राहाणार नाही. यामुळे अत्यावश्यक सेवा पोहोचण्यास मोठा विलंब होण्याची शक्यता असल्याने हा निर्णय मागे घेण्यात यावा, अशी मागणी होत होती.

ही मागणी लक्षात घेता, राज्य सरकारने या नियमातील मुद्दा क्र. ३ मध्ये बदल केले आहेत. त्यानुसार ‘मालवाहतूक करणाऱ्यांसाठी साधारणत: २ पेक्षा जास्त लोक (एक चालक+ क्लीनर किंवा मदतनीस) किंवा विशेष स्थितीत, लांब पल्ल्याच्या प्रवास किंवा आपत्कालीन स्थितीत मालवाहतूक करणाऱ्यांसाठी ३ व्यक्ती (२ चालक+ क्लीनर/ मदतनीस) यांना प्रवास करण्याची परवानगी असेल. 

जर हे मालवाहक महाराष्ट्र राज्याबाहेरुन प्रवास करुन राज्यात येत असतील, तर त्यांच्या शरीराचं तापमान व इतर लक्षणे तसंच ‘आरोग्य सेतू’ मध्ये त्यांच्या स्थितीची शहानिशा केल्यावरच त्यांना राज्यात प्रवेश मिळेल. जर यापैकी एकाही व्यक्तिला लक्षणे असतील किंवा ताप असेल किंवा ‘आरोग्य सेतू’ मधील त्यांची स्थिती ‘सुरक्षित नाही (नॉट सेफ)’ अशी असेल तर त्या सर्वांना जवळच्या कोविड केअर सेंटर मध्ये पुढील तपासणीसाठी दाखल करण्यात येईल.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा