पालघरमध्ये अवकाळी पाऊस

  मुंबई  -  

  पालघर - पालघर जिल्ह्यामध्ये अचानक शुक्रवारी पाऊस पडला. किनारपट्टी भागातील केळवे-माहीम, डहाणू, सफाळे, मनोरवाडा परिसरात पाच ते दहा मिनिटे हलक्या सरींनी सुरूवात केली. डहाणू, सफाळे,  मनोर वाड्यात सकाळी साडे नऊच्या सुमारास पावसाने सुरूवात केली. तर केळवे-माहीम परिसरात दुपारी दीडच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह पाऊस पडला. दोन दिवसांपासून इथले वातावरण ढगाळ दिसत होते. पालघर जिल्ह्यात रब्बी पिकातील मूग, हरभरा, वाल, तूर कडधान्यांच्या पिकांच्या काढणीला सुरूवात होते. ही पिके सुकविण्यासाठी शेताजवळच्या खळ्यात आणि घरच्या अंगणात ठेवली जातात. या अवकाळी पावसाने कडधान्याबरोबर बहरलेला भाजीपाला आणि किनारपट्टीतील सुकविण्यासाठी ठेवलेल्या मासळीला फटका बसला.

  दरम्यान, पालघर जिल्ह्यात पडलेल्या अवकाळी पावसावर पर्यावरण तज्ज्ञ गिरीष राऊत यांनी मुंबई लाईव्हशी बोलताना सांगितले की, तापमान वाढ ही अनियंत्रित होत असल्याने अवकाळी पाऊस पडतो. पृथ्वीच्या तापमानात 2 अंश सेंटीग्रेडने वाढ झाली आहे. तसेच 1980 पासून ऋतू नियमित राहिले नाही. हजारो वर्षांपूर्वी ऋतू ज्याप्रमाणे वेळेवर येत असत तसं आता राहिलेलं नाही. हे निसर्ग आणि मानवासाठी अपरिवर्तनीय व धोकादायक आहे. यामुळेच मागे चंद्रपूर, वर्धा जिल्ह्यात वादळ, सोसाट्याचा वारा, बर्फ वृष्टी झाली हे तापमान वाढीमुळेच. नुकत्याच युनोने सादर केलेल्या अहवालामध्ये कार्बनडाय ऑक्साईड तसेच ज्या वायूमुळे तापमान वाढत आहे त्यावर बंदी घातलेली आहे. तर हवामान खाते पृथ्वीचे तापमान वाढत असल्याची माहितीही देत नसल्याचे पर्यावरण तज्ज्ञ गिरीष राऊत यांनी सांगितले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.