Advertisement

लसीकरणाच्या नावावर लोकांकडून उकळतात पैसे, भांडुपमधील प्रकार उघड


लसीकरणाच्या नावावर लोकांकडून उकळतात पैसे, भांडुपमधील प्रकार उघड
SHARES

हेपेटायटीस बी आणि कांजण्यांसह इतर लसीकरण महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे मोफत केलं जातं. मात्र भांडुपमध्ये महापालिकेच्या शीव रुग्णालयातील डॉक्टरांचे पथक असल्याचे भासवून लसीकरणाच्या नावावर पैसे उकळण्याचे प्रकार सुरू आहे. ही बाब निदर्शनास आणून देताच महापालिका यंत्रणाही कामाला लागली आहे.


या प्रकरणाची चौकशी करा

भांडुपमधील दिनाबामा पाटील नगर परिसरात मंगळवारी काही वैद्यकीय पथकाने येथील लहान मुलांची तपासणी करून त्यांची नोंदणी सुरू केली. प्रथम यासर्वांनी आपण पल्स पोलिओसंदर्भात सर्वे करत असल्याचं सांगितलं. आणि त्यानंतर या मुलांना हेपेटायटीस बी, कांजण्यासह इतर आजारांबाबतची लस टोचण्यासंदर्भात ५० रुपये घेऊन नोंदणी करण्यास सुरुवात केली. मात्र, महापालिकेतर्फे सर्व प्रकारचे लसीकरण हे मोफत असून त्याकरता शुल्क आकारले जात असल्याने स्थानिक रहिवासी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते यांनी महापालिकेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांच्याकडे तक्रार केली. त्याप्रमाणे ही बाब जाधव यांनी अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांना निवेदन देत या प्रकरणाची चौकशी करावी तसेच अशाप्रकारे गरीबांकडून पैसे उकळणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.


ही बाब गंभीर

या पथकातील लोकांनी प्रथम पल्स पोलिओचा सर्वे असल्याचं सांगितलं. पण पुढे लसीकरणासाठी ५० रुपये घेऊन नोंदणी केली आणि शीव रुग्णालयातर्फे ही लस दिली जाणार असल्याचे सांगितलं. त्यामुळे ही बाब अतिरिक्त आयुक्त कुंदन यांच्या निदर्शनास आणून देत ही बाब गंभीर असल्याचं म्हटलं आहे. लसीकरणासाठी कोणतेही पैसे आकारण्याचे धोरण नसून जर हा प्रकार घडला असेल तर त्याची चौकशी करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या जातील, असं आश्वासन दिल्याचं जाधव यांनी म्हटलं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा