ओला, उबर या अॅप बेस्ड टॅक्सी चालकांनी पुकारलेलं काम बंद आंदोलन गुरुवारी मुंबईसह नवी मुंबई आणि ठाण्यात १०० टक्के यशस्वी ठरलं. गुरुवारी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यासोबत बैठकीनंतरही कोणताही तोडगा न निघाल्याने शुक्रवारी पाचव्या दिवशीही आंदोलन सुरू आहे.
ओला, उबरच्या जवळपास ३० हजार चालकांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे. सोमवारी भाडेदरात वाढ करण्यासह केलेल्या अन्य मागण्या मान्य न झाल्याने मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत ओला, उबर टॅक्सी चालकांनी संपाचं हत्यार उपसलं. यामुळे ओला-उबरने नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मात्र चांगलेच हाल झाले आहेत. त्यांना आता सार्वजनिक वाहनांतून प्रवास करावा लागत आहे.
महाराष्ट्र राज्य, राष्ट्रीय कामगार संघ, मराठी कामगार सेना या संघटनेतर्फे हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे. या आंदोलनापूर्वी कंपन्यांच्या व्यवस्थापनास मागण्यांचं निवेदन देण्यात आले होतं. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने टॅक्सीचालकांबरोबरच प्रवाशांचेही हाल होत असल्याचा आरोप संघटनांकडून केला जात आहे.
आता जोपर्यंत चालकांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघटनेनं दिला आहे.