आपत्ती व्यवस्थापनासाठी महापालिकेचे एनडीआरएफच्या धर्तीवर २०० जवान

 Mumbai
आपत्ती व्यवस्थापनासाठी महापालिकेचे एनडीआरएफच्या धर्तीवर २०० जवान

मुंबई - मुंबई महापालिका आता एनडीआरएफच्या धर्तीवर महापालिकेच्या जवानांची नेमणूक करणार आहे. मुंबईतील भौगोलिक स्थिती पाहता राज्याच्या एनडीआरएफ जवानांवर अवलंबून राहण्याऐवजी महापालिका आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या माध्यमातून २०० जवानांची फौज तयार केली जाणार आहे. या सर्व जवानांना एनडीआरएफच्या धर्तीवर विशेष प्रशिक्षण देऊन महापलिकेच्या २४ प्रभागांमध्ये या जवानांची नेमणूक केली जाणार आहे. एनडीआरएफच्या धर्तीवर जवानांची नेमणूक करून आपत्ती व्यवस्थापन पथक तयार करणारी मुंबई महापलिका ही देशातील पहिली महापालिका ठरणार आहे.

मुंबईत अनेक प्रकारच्या आपत्तीचा सामना मुंबईकरांना कराव लागतो. त्यामुळे मुंबईतील अनेक भाग आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने संवेदनशील असून, याठिकाणी योग्यप्रकारे आपत्ती व्यवस्थापन राखणे आव्हानात्मक असते. याकरता महापालिकेने १९९९ मध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन केला होता. या कक्षाच्यावतीने आपत्ती दरम्यान तात्काळ व गुणवत्तापूर्ण आपत्ती व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने ‘शहर आपत्ती व्यवस्थापन पथक’अर्थात ‘सीडीआरएफ’ ची स्थापना करण्यात येणार आहे. या पथकामध्ये महापालिकेच्या सुरक्षा दलात मागील वर्षी भरती झालेल्या २०० जवानांचा समावेश करण्यात येणार आहे. या सर्व जवानांना केंद्र सरकारच्या अखत्यारितील ‘एनडीआरएफ’ द्वारे तसेच भारतीय सैन्य दलाद्वारे देखील विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामध्ये रासायनिक, जैविक, अणू नैसर्गिक वा आण्विक आपत्ती, वैद्यकीय प्रथम प्रतिसादक प्रशिक्षण, कोसळलेल्या बांधकामात अडकलेल्या लोकांची सुटका करणे, पुराच्या पाण्यातून लोकांना वाचविणे, उंच इमारतींमधील आपत्ती प्रसंगी लोकांचा बचाव करणे यासारख्या बाबींचा समावेश असणार आहे. त्याचबरोबर भूकंप काळात मदत आणि पुनर्वसन करणे यासह विविध नैसर्गिक वा मानवनिर्मित आपत्तींमध्ये करावयाच्या कामांबाबत देखील या जवानांना सुयोग्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. ‘एनडीआरएफ’ च्या धर्तीवर खास मुंबईसाठी ‘शहर आपत्ती व्यवस्थापन पथक’ स्थापन करण्यात येणार असल्याने स्वतःचे आपत्ती व्यवस्थापन पथक असणारे (City Disaster Response Force / CDRF) मुंबई हे देशातील पहिले शहर ठरणार आहे.

‘शहर आपत्ती व्यवस्थापन पथक’ हे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (आपत्कालीन व्यवस्थापन) यांच्या अखत्यारित असणार आहे. शांततेच्या काळात या पथकातील प्रशिक्षित कर्मचारी हे महापालिकेच्या प्रमुख सुरक्षा अधिकारी यांच्या अखत्यारित कार्यरत असतील. मात्र, आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास या कर्मचाऱ्यांचा ताबा हा त्वरीत महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाच्या प्रमुख अधिकाऱ्यांकडे वर्ग केला जाणार आहे. मुंबई शहराची लोकसंख्या आणि आपत्ती संभाव्यता लक्षात घेता, मुंबईसाठी स्वतःचे आपत्ती व्यवस्थापन पथक उभारण्यास महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी मंजूरी दिली असल्याचे महापालिकेच्या आपत्ती विभागाचे प्रमुख महेश नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे.

Loading Comments