Advertisement

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सुरक्षा व्यवस्थेत वाढ

आॅगस्ट महिन्यात येणाऱ्या बकरी ईदपाठोपाठ १५ ऑगस्ट, दहिकाला आणि गणेशोत्सव या सणांच्या पार्श्वभूमीवर मुंबईची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सुरक्षा व्यवस्थेत वाढ
SHARES

काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम ३७० हटविल्यानंतर देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर दहशतवादी कारवायांचं सावट घोंगावत आहे. त्यामुळे आॅगस्ट महिन्यात येणाऱ्या बकरी ईदपाठोपाठ १५ ऑगस्ट, दहिकाला आणि गणेशोत्सव या सणांच्या पार्श्वभूमीवर मुंबईची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या सणांदरम्यान समाजकंटकांकडून घातपाती कृत्ये घडवली जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळेच मुंबईसह संपूर्ण राज्यात दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. सर्व संवेदनशील ठिकाणांवरील सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

दहशतवादी कट

देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखऱ्या जाणाऱ्या मुंबईवर कायमच दहशतवादी हल्ल्याचं सावट असतं. मुंबईसह राजधानी दिल्लीत 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेचे अतिरेकी हल्ल्याच्या तयारीत असल्याची माहिती भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या हाती आली आहे. जैशचा दहशतवादी इब्राहिम असगर यांनी हल्ल्याचा कट रचला असल्याची माहिती यंत्रणांना मिळाली असून त्यानुसार सुरक्षा यंत्रणांना कंबर कसून योग्य ती दक्षता बाळगण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. 


सुरक्षा व्यवस्था चोख

त्यामुळेच पोलिसांसमोर आता सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्याचं आव्हान आहे. यंदा नेहमीपेक्षा कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांच्या सुट्या रद्द करण्यात आल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं. तसंच अतिसंवेदनशील इमारतींसह सर्व धार्मिक स्थळे, सरकारी इमारती आणि गर्दीच्या ठिकाणी पोलिस पथकं तैनात करण्यात आली आहेत. राज्यभरात ध्वजावंदनाचे कार्यक्रम होणारी ठिकाणे, मोठे दहिकाला व गणेश उत्सवाचे आयोजक, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा वावर असलेल्या स्थळांवर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. राज्य राखीव पोलिस दल, दंगल विरोधी पथक, शीघ्र कृती दल, यांनाही सतर्क राहण्यास सांगितलं आहे.

संशयास्पद हालचालींवर लक्ष

शहरातील टोल नाक्यांवर संशयीत वाहनांची तपासणी केली जाणार आहे. सोशल मीडियावर अफवा पसरवू नये, यासाठी सायबर पोलिस लक्ष ठेवून राहणार आहेत. स्थानिक क्षेत्रात मोहल्ला कमिटीतील सदस्यांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. शहरातील ६ हजार सीसीटीव्ही कॅमेरे सर्व हालचालींवर लक्ष ठेवून राहणार आहेत. मुंबईत गेल्या आठवड्यापासूनच झोपडपट्टी परिसर, हॉटेल, निवासी वसाहतींमध्ये पोलिसांनी "कोम्बिंग ऑपरेशन' उघडून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना ताब्यात घेण्यास सुरूवात केली आहे. वाहतूक विभागाकडून महत्वाच्या मार्गांवर नाकाबंदी ठेवण्यात येणार आहे.

'या' ठिकाणांवर सुरक्षा

मुंबईसह महाराष्ट्रातील संरक्षण दलाची महत्त्वाची कार्यालये व केंद्र, महत्त्वाची धार्मिक स्थळे, सरकारी कार्यालये, गजबजलेली मार्केट, हॉटेल, रेल्वे स्टेशन, शॉपिंग मॉल, चित्रपटगृहांवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राजकीय किंवा धार्मिक कार्यक्रमात किंवा मोर्चाच्या काळात महत्त्वाच्या किंवा अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना लक्ष्य करण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अल कायदाच्या या अतिरेक्यांना स्थानिक पातळीवर किंवा असामाजिक तत्त्वांकडून मदत मिळू शकते. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रातील मोठ्या शहरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याच्या तसंच संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना केंद्रीय गुप्तचर खात्याने दिल्या आहेत.



हेही वाचा-

एजंट स्मिथची आहे तुमच्या खात्यातील पैशांवर नजर

सावधान! 'स्मार्ट टीव्ही' ठेवतोय तुमच्यावर 'वाॅच'



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा