Advertisement

गोखले उड्डाणपूल दिवाळीपर्यंत खुला होण्याची चिन्हे

बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) अंधेरी येथील गोखले पुलाच्या रेल्वे भागावर किमान सप्टेंबरच्या अखेरीस गर्डर टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

गोखले उड्डाणपूल दिवाळीपर्यंत खुला होण्याची चिन्हे
(File Image)
SHARES

अंधेरी रेल्वे स्थानकावरील गोखले उड्डाणपुलाची एक मार्गिका दिवाळीपर्यंत खुली केली जाणार आहे. या पुलाची एक मार्गिका गेल्या मे महिन्यापर्यंत खुली केली जाणार होती. मात्र पुलासाठी होणाऱ्या पोलादाच्या पुरवठ्यात अडथळा आल्याने पुलाचे काम रखडले. पोलादाचा पुरवठा सुरळीत झाल्याने पुलाच्या कामाला गती मिळाली आहे. 

रेल्वेच्या भागावर दोन पिअर बांधण्याचे काम सुरू असून तेही महिनाअखेरीस पूर्ण होईल. त्यानंतर पालिका आणि रेल्वेच्या अखत्यारीतील भाग पूर्ण होतील. त्यानंतर स्लॅब आणि काँक्रिटीकरणाचे काम सुरू होईल.

दिवाळीपर्यंत एक मार्गिका सुरू करणे आणि डिसेंबर २०२३ अखेरीस संपूर्ण पूल खुला करणे, यासाठी मुंबई महापालिका प्रयत्नशील आहे. पालिकेच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार हा पूल चौपदरी असेल. या प्रकल्पाची किंमत सुमारे 160 कोटी रुपये आहे.

पालिकेने नोव्हेंबर 2022 मध्ये हा पूल वाहतुकीसाठी बंद केला होता. त्यामुळे अंधेरी, जोगेश्वरी आणि विलेपार्ले येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. 2018 मध्ये पुलाचा काही भाग कोसळला. दोन वर्षांनंतर BMC ने 2020 मध्ये पुलाकडे जाण्याचा मार्ग तयार करण्यासाठी वर्क ऑर्डर जारी केली. मात्र साथीच्या आजारामुळे हे काम रखडले होते.

सन १९७५मध्ये बांधण्यात आलेल्या गोखले पुलाचा भाग ३ जुलै २०१८ला कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला होता. रेल्वे हद्दीतील भाग धोकादायक असल्याच्या तक्रारीमुळे त्याचे काम हाती घेण्यात आले आणि ७ नोव्हेंबर २०२२पासून पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. गोखले उड्डाणपुलाचे पाडकाम पश्चिम रेल्वे, तर पुलाची पुर्नबांधणी मुंबई महापालिका करत आहे. पूल पुर्नबांधणीचे काम मे २०२३पर्यंत पूर्ण करून किमान एक मार्गिका सुरू करण्याचा प्रयत्न होता. मात्र या कामाला पोलाद पुरवठ्यात उद्भवलेल्या अडचणीमुळे विलंब झाला.

सध्या, या परिसरात वाहन चालकांसाठी अंधेरी भुयारी मार्ग आणि विनायक गोरे उड्डाणपूल हे दोन पर्यायी मार्ग आहेत. अंधेरी भुयारी मार्ग हा सर्वात पसंतीच्या पर्यायी मार्गांपैकी एक असतानाच पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून वाहतुकीची समस्या निर्माण होते. त्यामुळे संतप्त स्थानिकांनी पुलाच्या पुनर्बांधणीच्या कामाला वेग देण्याची मागणी केली आहे.


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा