कमिशन विरोधात ‘वन रुपी' क्लिनिकचाही पुढाकार

 Mumbai
कमिशन विरोधात ‘वन रुपी' क्लिनिकचाही पुढाकार

एशियन हार्ट हॉस्पिटलने सुरू केलेल्या डॉक्टरांच्या ‘कट प्रॅक्टिस’ विरोधातल्या मोहिमेत आता ‘वन रुपी क्लिनिक’ने ही सहभाग घेतला आहे. वन रुपी क्लिनिकद्वारे डॉक्टरांच्या कट प्रॅक्टिसला आळा घालण्यासाठी ‘से नो टू कट प्रॅकिट्स’ अशी मोहीम सुरू करण्यात आली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांच्या चुकीच्या प्रवृत्तींमुळे रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातली दरी वाढत चालली आहे. त्या दरीला कुठेतरी कमी करण्याच्या हेतूने ही मोहीम आम्ही राबवत असल्याचे वन रुपी क्लिनिकचे प्रमुख डॉ. राहुल घुले यांनी सांगितले.

डॉक्टर आणि रुग्ण यांचे नाते पारदर्शक असले पाहिजे. आरोग्य क्षेत्र ही स्वच्छ आणि पारदर्शक असले पाहिजे. त्यामुळे एक चांगला संदेश देण्याच्या हेतूमुळे आम्ही ही मोहीम हाती घेतली आहे. लोकांमध्ये जनजागृती व्हावी, लोकांना कळावे की, सत्य परिस्थिती काय आहे. ज्यामुळे ते ही जागृत होतील. आम्ही 1 रुपयांत रुग्णांना उपचार का देतो? जेणेकरुन त्यांना स्वस्तात चांगली सुविधा मिळावी आणि असाच प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे. तेव्हाच आरोग्यक्षेत्रात स्वच्छ आणि पारदर्शक काम होऊ शकेल आणि रुग्णांनाही त्याचा फायदा होऊ शकेल.

डॉ. राहुल घुले, संचालक, वन रुपी क्लिनिक

कट प्रॅक्टिस म्हणजे काय ?

कट प्रॅक्र्टिस म्हणजे डॉक्टरांना मिळणारे कमिशन. रुग्णांना औषधे खपवल्यास औषध कंपन्यांकडून डॉक्टरांना भेटवस्तू म्हणून परदेशातील सहली, वाहनांची ऑफर दिली जात असल्याचे बोलले जाते. खासगी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात दररोज अनेक औषध कंपन्यांचे प्रतिनिधी भेटीसाठी येतात. नव्याने आलेल्या औषधांची माहिती सांगत एमआर कंपनीद्वारे काही सुविधा, भेटवस्तू सुद्धा डॉक्टरांना देतात. अशाच कट प्रॅक्टिसमधून रुग्णांना मोठ्या प्रमाणात भुर्दंड बसतो. वन रुपी क्लिनिकच्या सर्व केंद्राद्वारे कट प्रॅक्र्टिसची माहिती आलेल्या रुग्णांना दिली जात आहे. जनजागृतीची मोहीम राबवण्यात आम्ही एशियन हार्ट हॉस्पिटलला मदत करत असल्याचेही डॉ. राहुल घुले यांनी स्पष्ट केले आहे.

गेल्या आठवड्यात वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एशियन हार्ट इन्स्टिट्यूट या हॉस्पिटलने 'नो कमिशन टू डॉक्टर' असे फलक लावले होते. त्यानंतर हा वाद समोर आला. त्यानंतर एशियन हार्ट हॉस्पिटलतर्फे लावण्यात आलेल्या फलकानंतर अनेक चर्चा रंगू लागल्या. गेली अनेक वर्ष इंडियन मेडिकल असोसिएशन डॉक्टरांना मिळणाऱ्या कमिशन विरोधात लढा देत आहे. पण, एशियन हार्ट हॉस्पिटलने शहराच्या मध्यात लावलेल्या फलकामुळे गोंधळ झाला. त्यामुळे तो फलक इंडियन मेडिकल असोसिएशनने एशियन हार्ट हॉस्पिटलला काढायला सांगितला. पण, कट प्रॅक्टिस थांबावी हाच या फलकामागचा उद्देश असल्याचे एशियन हार्ट रुग्णालयाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. रमाकांत पांडा यांनी सांगितले.

Loading Comments