दादरची 'वन रुपी क्लिनिक' फार्मसी रुम पुन्हा बांधणार

  Dadar
  दादरची 'वन रुपी क्लिनिक' फार्मसी रुम पुन्हा बांधणार
  मुंबई  -  

  रेल्वे प्रवाशांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. तसंच काही जण अपघातात जखमीही होतात. त्यामुळे अशा प्रवाशांना तात्काळ प्राथमिक उपचार मिळावेत या हेतूने 'वन रुपी क्लिनिक' मुंबईच्या घाटकोपर, दादर, वडाळा, माटुंगा आणि कुर्ला या परिसरात सुरू करण्यात आलं. सोमवारी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन करण्यात आलं. त्यानंतर बुधवारी चिकित्सालयाच्या बाजूला फार्मसी उभी करू दिली जाणार नाही असं सांगत दादरची फार्मसी रुम 'मध्य रेल्वे'ने पाडली. दुसऱ्याच दिवशी मुंबईत सुरू करण्यात आलेले सर्व चिकित्सालय बंद करण्याचा निर्णय 'वन रुपी' उपचार चिकित्सालयाचे प्रमुख डॉक्टर राहुल घुले आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतला. पण, लगेचच गुरुवारी राहुल घुले आणि त्यांच्या टीमने 'मध्य रेल्वे'चे डिएमआर रविंद्र गोयल यांची भेट घेतली आणि मध्य रेल्वे आणि मॅजिक डील यांच्यातील वाद संपला असल्याची माहिती मध्य रेल्वेचे डीएमआर रविंद्र गोएल यांनी दिली. आम्ही चिकित्सालयाच्या बाजूची तोडलेली फार्मसी रुम लवकरात लवकर बांधून देऊ असं आश्वासन रविंद्र गोयल यांनी दिलंय.

  रेल्वेने नियुक्त केलेल्या जागेपेक्षा अतिरिक्त जागेत फार्मसी बांधकाम केल्यामुळे त्या बांधकामावर कारवाई करण्यास सांगितले होते. त्यानुसार डॉ. घुले यांनी स्वत: ते बांधकाम पाडले. आता मात्र हा वाद पूर्णत: शमला असून, रेल्वे प्रवाशांना यापुढेही एका रुपयात वैद्यकीय सुविधा मिळणार आहेत.

  - रविंद्र गोएल, डिव्हिझनल रेल्वे मॅनेजर, मध्य रेल्वे

  बुधवारी मध्य रेल्वेच्या काही अधिकाऱ्यांनी फार्मसीला परवानगी नसल्याचं कारण देत अचानक फार्मसी तोडली. त्यानंतर गुरुवारी सकाळपासून हे उपचार चिकित्सालय बंद ठेवण्यात आले होते. पण, प्रवाशांनी विचारपूस केल्यानंतर संध्याकाळी या उपचार केंद्राबाहेर प्रवाशांची गर्दी जमली. त्यामुळे संध्याकाळपासून घाटकोपर, कुर्ला, वडाळा, माटुंगा आणि दादर इथले सर्व चिकित्सालय सुरू करण्याचा निर्णय 'वन रुपी क्लिनिक' चिकित्सालयाचे प्रमुख डॉक्टर राहुल घुले आणि त्यांच्या टीमने घेतला.

  आत्तापर्यंत घाटकोपरच्या चिकित्सालयात जवळपास 1000 प्रवाशांनी तपासणी केली आहे. तसंच कुर्ल्याच्या चिकित्सालयात फक्त 3 दिवसांत 700 प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. दादरच्या लेडिज स्पेशल क्लिनिकमध्ये 240 प्रवाशांची, वडाळ्यातल्या चिकित्सालयात 90 प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. तर, एकंदरीत 2000 रुग्णांची तपासणी या चिकित्सालयात करण्यात आली आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.