महापालिकेच्या रुग्णालयांत फक्त मुंबईकरांनाच वैद्यकीय उपचारात सवलत?

  BMC
  महापालिकेच्या रुग्णालयांत फक्त मुंबईकरांनाच वैद्यकीय उपचारात सवलत?
  मुंबई  -  

  मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मुंबईसह महाराष्ट्र आणि देशभरातून रुग्ण उपचारासाठी येतात. परंतु महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये सरसकट सर्वच रुग्णांना सवलतीच्या दरात वैद्यकीय सुविधा देण्यात येत असल्यामुळे याचा ताण महापालिकेच्या रुग्णालयांवर पडत आहे. त्यामुळे मुंबईतील करदात्यांसाठी अधिक सुलभपणे आणि विनासायास उपचार मिळवण्याकरता, रुग्णांना मुंबईतील निवासस्थानाच्या पुराव्याआधारेच सवलतीच्या दरात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. या मागणीच्या आडून पुन्हा एकदा शिवसेनेने बाहेरून येणाऱ्या रुग्णांना सवलतीत उपचार न देण्याची अप्रत्यक्ष मागणी केलेली आहे.

  मुंबई महापालिकेच्या 3 प्रमुख रुग्णालयांसह विशेष रुग्णालये तसेच 16 उपनगरीय रुग्णालये, प्रसुतीगृह आणि दवाखाने तथा आरोग्यकेंद्रांमध्ये सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीकोनातून महापालिकेच्या वतीने सुविधा पुरवली जाते. मात्र, महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये होणारी गर्दी यामुळे वैद्यकीय सुविधेचा बोजवारा उडत आहे. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या रुग्णांकडून अधिक शुल्क आकारण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला होता. परंतु प्रशासनाच्या या प्रस्तावाला सत्ताधारी पक्ष वगळता सर्वच पक्षांनी तीव्र विरोध केला होता. पण आता सत्ताधारी शिवसेना पक्षाने पुन्हा ही मागणी लावून धरली आहे. शिवसेनेचे नगरसेवक मंगेश सातमकर यांनी ठरावाच्या सुचनेद्वारे ही मागणी करत मुंबईत राहत असलेल्या निवासस्थानाच्या पुराव्याच्या आधारेच रुग्णांना सवलतीत आणि प्राधान्यक्रमाने आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली आहे. सार्वजनिक आरोग्य सेवा पुरवणे हे महापालिकेचे बंधनकारक कर्तव्य आहे. त्यानुसार आरोग्य केंद्राद्वारे मुंबईतील करदात्यांना विविध कराच्या माध्यमातून आरोग्य सेवा देत आहे.

  महापालिकेच्या या प्रमुख रुग्णालयांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तराच्या शस्त्रक्रिया आणि उपचार पद्धत केली जात असल्याने या रुग्णालयांमध्ये निरनिराळ्या राज्यातून अनेक रुग्ण उपचारासाठी येत असतात. अन्य राज्यातून आलेल्या रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे मुंबईकर करदात्यांना आरोग्य सेवेचा म्हणावा तसा लाभ होत नसल्याचे सातमकर यांनी आपल्या ठरावाच्या सुचनेत म्हटले आहे. मुंबईकर करदात्यांना अधिक सुलभपणे आणि विनासायास उपचार मिळण्याकरता त्यांच्या मुंबईतील राहत्या निवासस्थानाच्या पुराव्याच्या आधारे त्यांना सवलतीत आणि प्राधान्यक्रमाने उपचार दिल्यास करदात्यांच्यादृष्टीने सोयीचे होईल, असे मंगेश सातमकर यांनी स्पष्ट केले आहे.

  विरोधी पक्षनेते रवि राजा यांनी मात्र, याचा तीव्र विरोध केला आहे. सभागृहात ही ठरावाची सूचना मांडली जाईल, तेव्हा आम्ही याचा विरोध निश्चितच करणार आहोत. मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. त्यामुळे इथे सर्वच येत असतात. ही ठरावाची सूचना मांडून एकप्रकारे बाहेरून येणाऱ्यांना जास्त शुल्क आकारण्याची मागणी आहे. रुग्णालयात येणारा रुग्ण हा कुठल्या शहरातील हे महत्त्वाचा नसून त्याचा आजार आणि उपचाराची गरज ओळखून प्राधान्यक्रम दिला जावा, अशी मागणी राहिल, असेही रवि राजा यांनी स्पष्ट केले. मुंबईतील रुग्णालयात बाहेरील राज्यातील रुग्ण येतात, ही गौरवाची बाब असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.