Advertisement

हॉटेलच्या गच्चीवरील पार्टीवरून पुन्हा रंगणार रणकंदन


हॉटेलच्या गच्चीवरील पार्टीवरून पुन्हा रंगणार रणकंदन
SHARES

हॉटेलच्या गच्चीवर पार्टीचं आयोजन करण्यास परवानगी देण्याच्या धोरणावरून महापालिकेत पुन्हा एकदा रणकंदन माजणार आहे. महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी महापालिकेची मान्यता न घेताच या धोरणाची अमलबाजवणी केली आहे. त्यामुळे या धोरणावर सभागृहात चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षांनी विशेष सभेचं आयोजन करण्याची मागणी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याकडे केली आहे.


नगरसेवकांनाच विश्वासात घेतले नाही

मुंबईतील उपाहारगृह (हॉटेलच्या) एकाच आस्थापनाखाली असलेल्या इमारतीच्या गच्चीवर अन्नपुरवठा करण्यास परवानगी देण्याचं धोरण सुधार समितीने फेटाळून लावल्यानंतर, मागील नोव्हेंबर महिन्यात महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी आपल्या अधिकारात परवानगी देऊन त्याच्या अंमलबजावणीचे आदेश दिले होते. मात्र, सुधार समितीने फेटाळलेले धोरण आयुक्तांनी लागू करताना सभागृहापुढे हा प्रस्ताव आणून २३२ नगरसेवकांना विश्वासातच घेतले नाही.


अशा प्रकारची कार्यवाही चुकीची

हॉटेलच्या गच्चीवरील पार्टीबाबत आयुक्तांनी परस्पर निर्णय घेतल्यामुळे महापालिका विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांच्यासह स्थायी समिती सदस्य आसिफ झकेरिया आणि कमरजहाँ सिद्दिकी यांच्या स्वाक्षरीने तातडीच्या सभेचं आयोजन करण्याची मागणी केली आहे.

नागरिकांच्या जीवनाशी निगडित असलेल्या बाबींसंदर्भात धोरणात्मक निर्णय सभागृहात चर्चा करून घेण्यात येतात. सभागृहाने मंजुरी दिल्यानंतर प्रस्तावाची अंमलबजावणी केली जाते. पण या धोरणाच्या अंमलबजावणीत आयुक्तांनी नगरसेवकांना विश्वासातच घेतलं नाही. महापालिका सभागृह हे सर्वोच्च असून त्यामध्ये याबाबत निर्णय होणे बंधनकारक आहे. त्यामुळे सभागृहाचा अधिकार डावलून महापालिका आयुक्तांनी अशा प्रकारची कार्यवाही करणे उचित नसल्याचं रवी राजा यांनी म्हटलं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा