Advertisement

सुधार समितीत शिवसेनेची नाचक्की; प्रस्ताव घाईत मंजूर केल्यामुळे विरोधकांचा सभात्याग


सुधार समितीत शिवसेनेची नाचक्की; प्रस्ताव घाईत मंजूर केल्यामुळे विरोधकांचा सभात्याग
SHARES

एल अँड टी आणि रेमंडला जागा देण्यासाठी उतावीळ झालेल्या शिवसेनेला बुधवारी झालेल्या सुधार समितीच्या बैठकीत नामुष्कीला सामोरं जावं लागलं. या दोन्ही कंपन्यांना जागा देण्यासाठीचे प्रस्ताव सदस्यांना चर्चा करू न देता परस्पर मंजूर करण्यात आले. याचा निषेध म्हणून भाजपासह सर्व विरोधी पक्षांनीच सभात्याग केला. त्यामुळे समितीच्या बैठकीत शिवसेनेचे केवळ सातच सदस्य उरले. परंतु या सदस्यांमुळे गणसंख्या (कोरम) होऊ न शकल्यामुळे अखेर समिती अध्यक्ष दिलीप लांडे यांच्यावर सभेचं कामकाज गुंडाळण्याची नामुष्की ओढवली.


प्रस्तावावर बोलू दिलं नाही

सुधार समितीच्या बैठकीत साकीविहार रस्त्याच्या पूर्व व पश्चिमेस अस्तित्वात असलेल्या एल अँड टीच्या लेआऊटना जोडण्यासाठी साकीविहार रस्त्यांखालून जाणाऱ्या भुयारी मार्गास परवानगी देण्याचा प्रस्ताव होता. महापालिकेच्या जमिनीतून जाणाऱ्या या भुयारी मार्गाच्या वापर हक्कासाठी २३१० चौरस मीटरची जागा दिली जाणार आहे. यासाठी प्रतिवर्षी १४ लाख ६७ हजार रुपये एवढे शुल्क एल अँड टी कडून वसूल केलं जाणार आहे.

तर रेमंड लिमिटेड कंपनीला पवई येथील यापूर्वी १६ हजार ७३४ चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा प्रथम १९५८ पासून ते १९७६पर्यंत दिली होती. त्यानंतर या जागेचा भाडेकरार वाढवून ती एप्रिल २००१ पर्यंत दिली होती. परंतु आता एप्रिल २०२३पर्यंत हा भाडेकरार वाढवून दिला जात आहे. त्यामुळे मक्ता नुतनीकरणाचा हा प्रस्ताव सुधार समितीच्या विषय पत्रिकेवर तीन क्रमांकाचा होता. रेमंड आणि एल अँड टीच्या या प्रस्तावावर सदस्यांनी बोलण्यासाठी हात उंचावूनही त्यांना बोलू न देता थेट अध्यक्षांनी मंजूर केला.


अध्यक्षांचा निषेध

रेमंडच्या प्रस्तावावर अध्यक्षांनी बोलू न दिल्यामुळे विषय क्रमांक ४ असलेल्या एल अँड टीच्या प्रस्ताव पुकारताच सदस्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. सदस्यांना बोलू न देता आपण प्रस्ताव कसा काय मंजूर करता असा सवाल भाजपाचे प्रकाश गंगाधरे आणि काँग्रेसचे विठ्ठल लोकरे यांच्यासह सर्वच सदस्यांनी अध्यक्षांना धारेवर धरले. सदस्यांकडून गोंधळ सुरु असताना अध्यक्षांनी एल अँड टीचाही प्रस्ताव मंजूर करून टाकल्यामुळे भाजपासह सर्व विरोधी पक्षांचे सदस्य तीव्र संतापले आणि त्यांनी अध्यक्षांचा निषेध म्हणून सभात्याग केला.


मनमानी कारभाराचा निषेध

शिवसेना वगळता सर्वच पक्षांच्या सदस्यांनी सभात्याग केल्यामुळे सभागृहात केवळ शिवसेनेचे अध्यक्षांसह सातच सदस्य उरले होते. परंतु गणसंख्या पूर्ण होण्यासाठी ९ सदस्यांची गरज असते. त्यामुळे बैठक थांबवून अध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस, सपाच्या गटनेत्यांना फोन करून सदस्यांची जमवाजमव करण्यास सुरुवात केली. परंतु कोणीच सदस्य न आल्यामुळे गणसंख्येअभावी पुढील कामकाजच अध्यक्षांना तहकूब करावं लागलं. सदस्यांचा अधिकार डावलून मनमानी कारभार अध्यक्षांकडून सुरु असल्यामुळे याचा निषेध म्हणून सर्वच पक्षांच्या सदस्यांनी सभात्याग केल्याचं प्रकाश गंगाधरे यांनी सांगितलं.



हेही वाचा -

झाडाच्या 'त्या' तुटलेल्या फांदीला तारेचा संसर्ग

म्हणून मध्य रेल्वेवरील लोकल धावतात उशीरा



 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा