Advertisement

झाडाच्या 'त्या' तुटलेल्या फांदीला तारेचा संसर्ग


झाडाच्या  'त्या' तुटलेल्या फांदीला तारेचा संसर्ग
SHARES

 मुलुंडमधील गुरुगोविंद सिंग मार्गावरील हिंदुस्थान चौक येथे झाडाच्या तुटलेल्या फांदीला खोलवर रुतलेल्या आणि गुंडाळलेल्या तारेमुळे सेप्टीक (संसर्ग) झाल्याची बाब समोर आली अाहे. त्यामुळेच ही फांदी पडल्याचा अहवाल महापालिकेच्या उद्यान खात्याने दिला आहे.


फांदी पडून मृत्यू

मुलुंड येथील हिंदुस्थान चौकातील गुरु गोविंद सिंग मार्गावर मंगळवारी पिंपळाच्या झाडाची फांदी रिक्षावर पडून एकाचा मृत्यू झाला. तर ३ जण जखमी झाले. या मृत्यू झालेल्या व्यक्तीला जखमी अवस्थेत मुलुंड येथील एम.टी. अगरवाल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु रुग्णालयात वेळीच उपचार न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे सांगत भाजपाचे मनोज कोटक यांनी याला जबाबदार कोण असा सवाल केला.


३ ते ४ इंच आतमध्ये तार 

यावेळी झालेल्या चर्चेला प्रशासनाच्यावतीनं उत्तर देताना उपायुक्त (उद्यान) डॉ. क्षीरसागर यांनी त्या झाडाची आणि तुटलेल्या फांदीची तपासणी दोन उपउद्यान अधिक्षक आणि तीन सहायक उद्यान अधिक्षक यांच्या पथकाने केली आहे. याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला अाहे.  मोडून पडलेल्या फांदीच्या गाभ्यात सालीमध्ये ३ ते ४ इंच आतमध्ये तार रुतलेली अाणि गुंडाळलेली आढळून आली. त्यामुळे त्या फांदीच्या आतील भागात संसर्ग होऊन आतील भागातील पेशी कमकुवत झाल्याचं निदर्शनास आल्याचं अहवालात सांगण्यात अालं अाहे.


गाभ्यातील पेशींना संसर्ग

या फांदीला तारेमुळे झालेली इजा तथा जखम फांदीच्या आतील बाजूस असल्याने व इजा झालेला भाग जमिनीपासून सुमारे ३० फुट उंचीवर असल्याने नियमित पाहणीमध्ये ही बाब निदर्शनास आली नसल्याचं अहवालात म्हटल्याचं डॉ. क्षीरसागर यांनी सांगितलं. या झाडाच्या  खोलवर घुसलेल्या तारांमुळे फांदीच्या गाभ्यातील पेशींना संसर्ग होऊन त्यांना इजा पोहोचून पेशी कमकुवत झाल्याने ही फांदी मोडून पडल्याचा निष्कर्ष या पथकाने नोंदवला असल्याचं त्यांनी सांगितलं अाहे.


झाड चांगल्या स्थितीत 

गुरुगोविंद सिंग रस्त्यापासून ५ ते ६ फुट अंतरावर हे पिंपळाचं झाड अाहे. त्याचा घेर सुमारे ८ फूट एवढा आहे. त्यामुळे बाहेरुन पाहिल्यास हे झाड चांगल्या स्थितीत तसेच समतोल असल्याचं दिसून येत आहे. जी फांदी तुटून पडली होती, त्याचाही घेर दोन ते अडीच फुट असून त्याची सुमारे लांबी २० फुट आहे. आणि ती जमिनीपासून सुमारे ३० फुट उंचीवरून रिक्षावर पडली होती.



हेही वाचा -

म्हणून मध्य रेल्वेवरील लोकल धावतात उशीरा

महिलेचा जीव वाचवणाऱ्या कॉन्स्टेबलचा गौरव



 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा