Advertisement

मुंबईतली 'ऑक्सिजन फॅक्टरी'


मुंबईतली 'ऑक्सिजन फॅक्टरी'
SHARES

कांदिवली पूर्वेकडील समता नगर पोलीस ठाणे परिसरात चक्क एक 'ऑक्सिजन फॅक्टरी' कार्यरत आहे. विविध वस्तू आणि उत्पादने बनविणाऱ्या फॅक्टरीबद्दल तुम्ही आतापर्यंत एेकून असाल. पण 'ऑक्सिजन फॅक्टरी'? हा शब्द पहिल्यांदाच ऐकला असेल. पण हे खरं आहे. मुंबईतील सर्वात स्वच्छ आणि सुंदर अशी 'ऑक्सिजन फॅक्टरी' 2007 साली समता नगर पोलीस ठाणे परिसरातील जवळपास 1.5 एकरात उभारण्यात आली. या फॅक्टरीचा फायदा केवळ भारतीयच नव्हे, तर परदेशी नागरीकही अनुभवत आहेत. ही फॅक्टरी जपण्यासाठी खत्री कुटुंबातील दोन सदस्य सदैव कार्यरत असतात. 

ही 'ऑक्सिजन फॅक्टरी' येथे कशी तयार झाली आणि त्यामागचे कारण काय? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला समता नगर पोलीस ठाणे परिसराला आवर्जून भेट दिली पाहिजे. समता नगरपासून पश्चिम द्रुतगती महामार्ग काही मिनिटांच्या अंतरावरच आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना वाहनांपासून निर्माण होणाऱ्या वायूप्रदूषणाचा त्रास नेहमीच सहन करावा लागतो. शिवाय या भागात एकेकाळी एक डम्पिंग ग्राऊंडही होते. हे डम्पिंग ग्राऊंड प्रदूषणाचे केंद्र बनले होते.

एकेदिवशी ठाकूर व्हिलेजच्या 'व्हॉईसरॉय पार्क एएलएम'चे अध्यक्ष अफझल खत्री एका कामानिमित्त समता नगर पोलीस ठाण्यात गेले होते. त्यावेळी येथील प्रदूषणाची गंभीर बाब त्यांच्या लक्षात आली. तेव्हा त्यांनी तत्कालीन पोलीस अधिकारी विनायक मुळे यांची परवानगी घेऊन डम्पिंग ग्राऊंडचा ताबा घेतला आणि या जागेवर 'ऑक्सिजन फॅक्टरी' उभारण्याचे ठरवले. 'व्हॉईसरॉय पार्क एएलएम'च्या सदस्यांच्या मदतीने त्यांनी या जागेवर हिरवीगार झाडे लावून अक्षरश: नंदनवन फुलवले. सद्यस्थितीत समता नगर पोलीस ठाण्याच्या मागील भागाचा पूर्णत: कायापालट झाला असून निरनिराळ्या झाडांच्या माध्यमातून येथे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची निर्मिती होत आहे. त्यामुळेच या भागाला कौतुकाने 'ऑक्सिजन फॅक्टरी' असे म्हटले जाते.

समता नगर डम्पिंग ग्राऊंड 'ऑक्सिजन फॅक्टरी'त रुपांतरीत करण्याचा मार्ग काही सोपा नव्हता. त्यासाठी बऱ्याच जणांची मदत कामी आली. ती पुढीलप्रमाणे :
1 विद्यार्थ्यांचे वेळोवेळी मिळालेले श्रमदान
2 मुंबई महापालिकेचे सहकार्य, त्यांनी दिलेले अरॉबिक कम्पोस्ट पिट
3 एका समाजसेवकाकडून मिळालेली 1 ट्रक लाल माती
4 एका समाजसेवकाकडून मिळालेले 2 ट्रक मोठे दगड
5 एका समाजसेवकाकडून मिळालेल्या 1000 लाल विटा
6 मुंबई पोलीस आणि महापालिकेकडून मिळालेली मदत

या प्रकल्पाचे निर्माणकर्ते 67 वर्षीय अफझल खत्री म्हणाले, 35 वेगवेगळ्या प्रजातींचे पक्षी, 2 हजारहून अधिक प्रकारची झाडे, 37 प्रकारचे कोळी आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जीवजंतू या 'ऑक्सिजन फॅक्टरी'ची शोभा वाढवत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भारतीय आणि परदेशी निसर्गप्रेमी हा उपक्रम पाहण्यास, त्याचा अभ्यास करण्यास येथे येतात.

ठाकूर व्हिलेजमधील 24 वर्षीय रुपेश गावडे याने या 'ऑक्सिजन फॅक्टरी'त येऊन 'एमएससी इन बायो डायव्हर्सिटी'वर अभ्यास केला. 'हजारी मोगरा' झाडावरील मुंग्या स्वरक्षण कसे करतात? यावर त्याने येथे येऊन संशोधन केले. पुढे तो या विषयात पदवीधरही झाला.

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, असे म्हटले जाते. त्यानुसार या 'ऑक्सिजन फॅक्टरी'च्या उभारणीत अफझल खत्री यांच्या पत्नी नुसरत खत्री यांचाही मोलाचा हातभार आहे.

खत्री कुटुंब 2001 साली न्यूयॉर्कमधील व्यापार बंद करून आपल्या मायदेशी परतले. आपल्या मायभूमीसाठी काही तरी करायचे हे त्यांच्या मनात होते. भ्रष्टाचारमुक्ती, गरीबी हटवणे, शिक्षण प्रसार आणि पर्यावरण संवर्धन, असे चार पर्याय त्यांच्यापुढे होते. त्यातून खत्री कुटुंबाने पर्यावरण संवर्धनाचा पर्याय स्वीकारला. या कामात अनेक कार्यकत्यांची मदत त्यांना मिळाल्याची माहिती 65 वर्षीय नुसरत खत्री यांनी दिली

परदेशातून मायदेशी परतलेले खत्री कुटुंबीय जर पुढाकार घेऊन एका डम्पिंग ग्राऊंडला नंदनवन बनवू शकतात, तर मुंबईतच लहानचे मोठे झालेले मुंबईकर का नाही?

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा